पिंपरी महापालिकेचा कोण होणार भाजपचा पहिला महापौर?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपकडून महापौर पदासाठी 10 जण प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. 

पिंपरीचे महापौरपद ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपकडून या गटातील 24 उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी दहा जण महापौर पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. महापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातून शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, शशिकांत कदम पिंपरी मतदार संघातून संदीप वाघेरे, केशव घोळवे, भोसरी मतदार संघातून नितीन काळजे, सागर गवळी, संतोष लोंढे हे प्रबळ दावेदार आहेत.  

महापौर पदासाठी निष्ठावान आणि आयात हा मुद्दा कळीचा ठरु शकतो. राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झाले आहेत. त्यांचीही महापौर होण्याची इच्छा आहे. निष्ठावंताला पद देण्याचा विचार झाल्यास चिंचवड मतदार संघातून भाजपचे जुने कार्यकर्ते नामदेव ढाके हे प्रबळ दावेदार आहेत.   

भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार  लक्ष्मण जगताप आपला समर्थक महापौर होण्यासाठी तर, भोसरीचे आमदार महेश लांडगे आपल्या समर्थकाला महापौरपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महापौर पदाच्या दावेदारांचीही  हे पद आपल्याला मिळावे व आपण या पदासाठी कसे चांगले आहोत,  हे नेत्यांसमोर सांगण्याची चढाओढ सुरु झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी झाला आहे. भाजपचे तीनवरील संख्याबळ 77 पर्यंत गेले आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीचे 83 वरुन 36 वर संख्याबळ आले आहे. शिवसेनेचे पूर्वीपेक्षाही संख्याबळ घटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.