बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

गणेश बिडकरांचे पुनर्वसन होणार का ?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून 162 जागांपैकी 98 जागी कमळ फुलले आहे. या आकडेवारीवरून महापालिकेमध्ये भाजपचे 4 नगरसेवक स्वीकृत म्हणून जाणार आहे. त्यामध्ये प्रभाग 16 मध्ये गटनेते गणेश बिडकर यांचा रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्याने भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे बिडकर यांचे स्वीकृत म्हणून पुर्नवसन होणार का अशी चर्चा भाजपमध्ये रंगली आहे.

 

राज्यामध्ये पार पडलेल्या महापालिका आणि निवडणुकीमध्ये भाजपला क्रमांक एकचा पक्ष म्हणून जनतेने निवडून दिले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे महापालिकेत 162 जागांपैकी 98 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहे. या निकालाने पुण्यातील सर्व राजकीय पक्षांना आर्श्चयाचा धक्का बसला असून पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील प्रभागातून भाजप गटनेते गणेश बिडकर, अपक्ष रवींद्र धंगेकर यांची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. कारण भाजपचा बालेकिल्ला कसबा असल्याने यामध्ये अगदी सहजपणे बिडकर विजयी होतील, असा अंदाज सर्वांचा होता.

 

मात्र, मतदार राजाने रवींद्र धंगेकरांच्या पारड्यात मतदान करून बिडकर यांना घरचा रस्ता दाखविण्याचे काम केले आहे. या त्यांच्या राजकीय जीवनातील पराभवामुळे पुढील वाटचालीस ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्यांचे महापालिकेतील सभागृहातील दरवाजे उघडण्याची शक्यता असून भाजपचे 98 नगरसेवक निवडून आल्याने महापालिका नियमानुसार 30 नगरसेवकामागे 1 नगरसेवक स्वीकृत म्हणून सभागृहात जाऊ शकतो. 4 जण स्वीकृत म्हणून निवडून जाणार आहे. यामुळे गणेश बिडकर यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. उज्वल केसकर, जोत्सना सरदेशपांडे, गोपाल चिंतल, सतीश बहिरट, सुहास कुलकर्णी तसेच बिडकरांसहवरील 3 जणांपैकी कोणाला संधी दिले जाते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

spot_img
Latest news
Related news