शनिवार, डिसेंबर 3, 2022

पिंपरी महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील गेल्या 15 वर्षापासून असलेली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता गेल्यांनतर आता विरोधी पक्षनेता पदाची कमान कोणाकडे दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेवर आरुढ होणा-या भाजपची कोंडी करण्यासाठी हे पद आक्रमक नेत्याला दिले जाते की नव्या चेह-याकडे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सत्ताधा-यांची कोंडी करण्यासाठी अनुभवी नगरसेवकाला विरोधी पक्षनेते पद द्यायचे झाल्यास महापालिकेच्या कामकाजाची चांगली माहिती असलेले माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, नाना काटे आक्रमक नगरसेवक अशी ओळख असलेले दत्ता साने यांचा विचार केला जाऊ शकतो.

विरोधी पक्षनेता देताना अभ्यासूवृत्ती आणि बोलण्याचे कौशल्य निवडणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेत्याने सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामावर बोट ठेवले पाहिजे. त्याचा अभ्यास असला पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाकडे विरोधी पक्षनेतेपद देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेत राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याची सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्षाची भूमिका कशी पार पाडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Latest news
Related news