बस स्थानकांमध्येही घुमणार मराठी राजभाषा दिनाचा गजर

एमपीसी न्यूज – एसटी महामंडळाकडून कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त सोमवारी (दि. 27) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला असून, पिंपरीतील वल्लभनगर आगार येथे सोमवारी (दि.27) प्रत्येक बस स्थानकावर स्थानिकांच्या उपस्थितीमध्ये ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख अनिल भिसे यांनी दिली.

या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध लेखकांची प्रवास वर्णनांची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रवाशांना भेट देण्यात येणार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी संबंधित शहरातील साहित्यीक, कवी, प्राध्यापक, पत्रकार यांना आमंत्रित केले जाणार आहे. एसटीच्या प्रमुख बस स्थानकांवर प्रवासी व एसटी कर्मचार्‍यांना सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक बस स्थानकाची स्वच्छता करून तेथे रांगोळी, प्रवेशद्वाराची सजावट करण्यात येणार आहे.



प्रत्येक प्रवाशाला मराठी भाषेतील साहित्याची ओळख व्हावी, मराठी भाषेतील गोडवा कळावा, यासाठी मराठीतील कथा व कवितांचे वाचन केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.