नाम फाऊंडेशन आणि राजेश काची यांना ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा संस्थात्मक कार्यासाठीचा ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ नाम फाऊंडेशन संस्थेला देण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत, माहिती न्यासाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

हा पुरस्कार सोहळा सोमवारी (दि.27) भारती विद्यापीठाच्या, धनकवडी शैक्षणिक संकुलात होणार असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, "भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिजित कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशन’ या न्यासाची स्थापना 2000 मध्ये केली. अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी मानवतावादी दृष्टिकोनातून जनसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला आणि व्यक्तीला ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ प्रदान केला जातो.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे दुःख सांत्वनापलीकडचे होते. अशा वेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी त्यांना वैयक्तिकपातळीवर आर्थिक मदत केली. काही निवडक कुटुंबियांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. ‘नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी जे काम उभे केले आहे, ते अतुलनीय आहे. हे काम त्यांच्या सहृदयतेची आणि संवेदनशीलतेची साक्ष देणारे आहे. त्यांची ‘नाम’ ही संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची आधारवड बनली आहे. केवळ पोकळ सहानुभूती न दाखवता त्या कुटुंबांचा भविष्यातला मार्ग सुकर व्हावा, यासाठी त्यांनी जे कृतीशील योगदान दिले आहे त्याला अभिवादन करण्यासाठी यावर्षीचा ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ ‘नाम’ या संस्थेला देण्याचे न्यासाने ठरविले आहे.

एखाद्याचे प्राण संकटात असोत की अपघात झालेला असो किंवा मृतदेह बाहेर काढायचा असेल तर हातातले काम बाजूला ठेवून धावणारे समाजसेवक म्हणून राजेश काची सर्वांना परिचित आहेत. आजवर शंभराहून अधिक लोकांना मदत करून त्यांनी त्यांचे प्राण वाचवले आहेत. तर दोनशेहून अधिक मृतदेह नदीपात्र, विहिरी तसेच महापुरातही पाण्याबाहेर काढून त्यांनी पोलिसांना मदत केली आहे. त्यांच्या मदतीमुळे विविध गुन्ह्यांची उकल होण्यासाठी पोलिसांना मदत झाली असून एक रुपयाही मदत न घेता काची यांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांना या वर्षीचा व्यक्तीसाठीचा अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार जाहीर करताना न्यासाला समाधान वाटते आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले.

या पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, असे आहे. वैयक्तिक कार्यासाठीचा पुरस्कार राजेश काची यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.