गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पुणे महापालिका निवडणुकीतील 200 पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात जाणार!

ईव्हीएम मशीनमध्ये भाजपकडून घोटाळ्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करण्यात आला. त्यांचे एवढे उमेदवार कसे येऊ शकतात. आम्ही एवढी वर्ष समाजात कामे केली असून त्या विरोधात 200 पराभूत उमेदवार उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे, अशी घोषणा माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी ईव्हीएम मशिनमधील घोटाळ्याच्या निषेधार्थ सभेत केली. तसेच ही निवडणूक पुन्हा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

या निषेध सभेला राष्ट्रवादीच्या अर्चना कांबळे, सुनील गोगले, शिवसेनेचे सचिन भगत, नीता मंजाळकर, मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह धनंजय जाधव, माजी आमदार बापू पठारे निषेध सभेत हजर  होते. राम बोरकर, मंदार बलकवडे, निलेश निकम, ऐश्वर्या जाधव, सुदर्शना त्रिगुणाईत, वैशाली चांदणे यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी आपला निषेध नोंदवला.  

यावेळी माजी सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले की, पुण्यातील एका भाजप खासदाराला सर्व निकाल माहिती होते. पेट्या कुठून आल्या, कुठे सील केल्या गेल्या याचे सर्व पुरावे आहेत. ते कोर्टात सादर करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीत हा लोकशाहीचा खून असून निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली.

माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके म्हणाले की, या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने दाबावाखाली येऊन काम केले असून भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळा केला आहे. मी आव्हान देतो दोन दिवसात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. जनतेचे सत्य बाहेर येईल, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सर्व पक्षीय उमेदवारांनी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

मंगळवारी शहरात मोर्चा

या सर्व प्रकाराविरोधात मंगळवारी 28 तारखेला शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर चौकातून हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार, कार्यकर्ते  आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

Latest news
Related news