मराठी भाषादिनानिमित्त चला दूर सारू या शुद्धलेखनाबाबतचा गोंधळ!

(स्वाती राठोड)

एमपीसी न्यूज – संघटीत, सडसडीत, बटबटित, असंघटीत, केंद्रीत, लक्ष केंद्रीत, आत्म केंद्रित, एकंदरीत, तयारीत, विस्कळीत, जळजळीत, तरतरित, एकत्रीत, व्यवस्थीत, एकेरित, दुहेरीत, तिहेरीत, असावित, खासगीत, गणित, गणगणीत, प्रमाणीत, फेरीत, लिपीत, पहिलीत, दुसरित, तिसरीत, चौथीत, मराठित, तरुण, तरून, वरूण, वरून, मरुन, धरून, करुण, अनील, सुनील, दिपक, दीपाली, वाहतूक, निवडणूक, लघू, लघुउद्योग, पकडुन, बांधून, बघुन, वाहून, सडकून, कडकडून, हळुहळु, मुळूमुळू, तुरूतरू, मुळ, मुळे……. बघू या बरं आपल्यापैकी किती जणांना हे शब्द शुद्ध स्वरुपात लिहिता येतात.

 

उडाला का गोंधळ? उच्चारताना ब-याच वेळा यमक जुळणारे हे शब्द लिहिताना मात्र आपल्याला चांगलाच चकवा देतात. त्यांच्या वेलांट्या आणि उकार यामध्ये फरक असतो. दररोजच्या मराठी बोलण्यात या आणि अशा अनेक शब्दांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, आपल्यापैकी किती जणांना हे शब्द शुद्ध स्वरुपात लिहिता येतात हा प्रश्न जर स्वतःने प्रत्येकाला एकदा जरी विचारला तरी आपलं मराठीचं ज्ञान किती कमी आहे याची जाणीव होईल.

 

मराठी आपली मातृभाषा तिचा प्रत्येकाला अभिमान. जगात 10 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठीची बोलीभाषा वेगळी आणि शुद्धस्वरुपातील लिखित भाषा यामध्ये अंतर आहे. त्यामुळे किती जणांना शुद्ध मराठी लिहिता येते हे पाहणेही मराठी भाषा दिनानिमित्त महत्वाचे आहे. का होतं असं? आयुष्यभर लहानपणापासून मराठी बोलतो. तरी लिहिण्याच्या बाबतीत का मागे पडतो? शाळेत याकडे केलेले दुर्लक्ष हे तर एक कारण आहेच. शुद्धलेखनाच्या नियमांबाबत असलेली अर्धवट माहिती. किंवा शुद्धलेखनाच्या नियमांबाबत असलेल्या दोन गटांमधील वाद तसेच माध्यमांतून लिखित मराठी पोहोचवताना ज्याने त्याने आपापल्या हिशोबाने कोणते नियम वापरायचे याबाबतचे ठरवलेले धोरण. उदाहरणार्थ – पोलीस हा शब्द काही माध्यमे ‘ली’ दुसरा वापरतात तर काही जण ‘लि’ पहिला वापरतात. असे अनेक शब्द आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उडालेला गोंधळ.

 

मराठी भाषा साहित्य मंडळाने 1962 मध्ये मराठी शुद्धलेखनाचे नियम तयार केले. त्यापैकी 18 महत्वाचे नियम लक्षात ठेवले की मराठी शुद्धलेखन लिहिता येतात. मात्र, यावर हे नियम संस्कृतप्रमाणे केले आहेत, असा आक्षेप घेऊन सध्या अनेकांनी यापैकी काही नियमांमध्ये बदल आवश्यक आहे, असे म्हणत त्यांचा वापर करणे बंद केले. त्यापैकी संस्कृत, फारसी, इंग्रजी या भाषेतून मराठीत आलेले आणि मराठीने स्वीकारलेले शब्द यांना हे नियम लागू होत नाही. त्यांना त्या-त्या भाषेत ते शब्द जसे लिहितात तसेच ते मराठीत लिहिण्याचा नियम आहे, या नियमावर अनेकांचा आक्षेप आहे.

 

तर काही मंडळी अशा आहेत ज्यांचे म्हणणे असे आहे की, ज्ञानेश्वरांपासून 1962 पर्यंत लिखित मराठीमध्ये असे नियम नव्हते. त्याकाळी बहुतांशी मराठी मोडी लिपीत लिहिली जात होती. तिथे हा प्रश्न नव्हता. त्यांना अशा नियमांची गरज पडली नाही. मग आताच या शुद्धलेखनाचा अट्टाहास का, शब्दांचा अर्थ कळणे एवढे पुरेसे आहे, असे म्हणत ‘शुद्धलेखनाच्या नियमांची ऐशीची तैशी’ असा सूर लावल्याचे सोशल मीडियावर आढळते. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना मान्य होईल, असे नियम असायला हवेत जेणेकरून वाद मिटून मराठीचा अधिकाधिक विकास होईल.

 

मराठी शुद्धलेखनात भरीव कामगिरी करून विविध पारितोषिक मिळविणारे अरुण फडके यांच्याशी या सर्वांबाबत एमपीसी न्यूजच्या वतीने संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ या संस्थेने 1962 साली मराठी शुद्धलेखनाचे नियम केले, आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण ते प्रचलित नियम म्हणून पाळतो. या नियमांमध्ये ऱ्हस्व-दीर्घाचे नियम करताना त्यांतील पहिलाच नियम महामंडळाने असा केला की, ‘‘संस्कृतातले मुळात ऱ्हस्वान्त शब्द मराठीत सुटे लिहिताना दीर्घान्त लिहावेत.‘‘ हा नियम ‘मराठीच्या प्रकृतीनुसार’ केला असल्याचेही महामंडळाने येथे म्हटले आहे. परंतु पुढे उपान्त्य इकार-उकार आणि सामासिक शब्द लिहिताना मात्र ऱ्हस्व-दीर्घ मूळ संस्कृतप्रमाणे लिहावे असे नियम केले. सामान्यरूपांच्या बाबतीतही असेच संस्कृतधार्जिणे नियम झाले.

 

वास्तविक पाहता या बाबतीत मराठीची प्रकृती अगदी सोपी आणि ठाम आहे. परंतु हे नियम करताना ‘मराठीची प्रकृती’ पाहिली गेली नाही. त्यामुळे उपान्त्य इकार-उकार, सामासिक शब्दांमधले इकार-उकार आणि सामान्यरूपांमधले इकार-उकार या जागांवर सामान्य माणसांकडून बहुधा जास्त चुका होतात असे दिसते. कारण ‘तो शब्द’ संस्कृतमधून मराठीत आला आहे हे ओळखायचे कसे ह्या प्रश्र्नाला काहीही उत्तर देता येत नाही. त्या शब्दांमध्ये असे कोणतेही वैशिष्ट्य नाही की पाहताक्षणीच ते संस्कृतमधून आले आहेत हे ओळखता येईल, किंवा असे कोणतेही निकष नाहीत की जे लावून ते शब्द संस्कृत आहेत हे ठरवता येईल. आणि तरीही ते शब्द मराठीच्या प्रकृतीनुसार लिहिता येत नाहीत आणि त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका होतात.

 

महामंडळ किंवा भाषेशी संबंधित शासनाची एखादी संस्था हे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणे करून देईल, असे काही चित्र आत्ता तरी दिसत नाही. त्यामुळे बहुसंख्य मराठी जनतेने ठरवायचे आणि अमलात आणायचे की, ‘संस्कृतसह अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत घेतलेला शब्द आम्ही मराठी मानून तो मराठीच्या प्रकृतीनुसार लिहिणार.’ असे काही क्रांतिकारी झाले, तरच या गोष्टीकडे लक्ष वेधले जाईल आणि याबाबत योग्य नियम केले जातील. ही गोष्ट एखाद्या वर्तमानपत्राने मनावर घेतली, तर सहज होऊ शकते असे वाटते.

 

तर हे नियम सर्वस्वी अमान्य असलेले आणि हे नियम कायमस्वरुपी रद्द होण्यासाठी प्रयत्न करीत असलेले शुभानन गांगल यांच्या म्हणण्यानुसार, छपाई यंत्राचा शोध लागला त्यानंतर मोडी लिपीचे ठसे बनवणे अवघड झाले. म्हणून मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात झाली. त्यापूर्वीपर्यंत एक उकार आणि एक वेलांटी अशाच प्रकारे मराठी गद्याचे लेखन केले जात असे. मात्र, 1962 मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमावलींमध्ये मराठीच्या प्रकृतीचा विचार न करता संस्कृत प्रमाणे -हस्व व दीर्घ असे नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे 90 टक्के लोकांना हे जड जाते. परिणामी मराठी भाषेचा विकास लिखित स्वरुपात खुंटत चालला आहे. शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत एक उकार आणि एक वेलांटी याप्रमाणेच लिहिले जात होते. तसेच मराठीत आपण व्यंजन आधी उच्चारतो नंतर त्याला जोडून स्वर आलेला असतो. त्यामुळे लिहिताना डावीकडून उजवीकडे याप्रमाणे सर्व इकार व उकार गद्यामध्ये दीर्घच असयला हवे. ते ही शुद्धच असणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

मात्र हे वाद जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत शुद्धलेखनाचे नियम पाळून आपण मराठी भाषा दिन साजरा करू या!

 

सुरुवातीच्या परिच्छेदात जे चुकीचे शब्द दिले आहेत ते शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे खालीलप्रमाणे बरोबर आहेत.

 

संघटित, असंघटित, बटबटीत, सडसडीत, एकत्रित, व्यवस्थित, एकेरीत, असावीत, प्रमाणित, दुसरीत, मराठीत, वरुण, तरुण, मरून अनिल, दीपक, लघु, लघुउद्योग, पकडून, बघून, हळूहळू, मुळूमुळू, केंद्रीत, लक्ष केंद्रीत, आत्मकेंद्रित, मूळ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.