राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराच्या चुलत्याची रिक्षाचालकाला मारहाण

निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार का केलास असे म्हणत रिक्षाचालकाला मारहाण  

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार का केलास असे म्हणत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराच्या चुलत्याने रिक्षाचालकाला दमदाटी करत हाताने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.26) रात्री पावणे नऊच्या सुमारास भोसरी येथे घडली. 

याप्रकरणी गोकुळ शिंदे (वय 50, रा. खंडोबा माळ, भोसरी) आणि काळुराम गव्हाणे (रा. भोसरी) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश बाबुराव मरे (वय 28, रा. लांडगे आळी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

महेश हे रिक्षाचालक आहेत. रविवारी रात्री ते भोसरीत त्यांच्या (एमएच 14, सीयू 4276) या रिक्षामध्ये बसले होते. त्यावेळी गोकुळ शिंदे आणि काळुराम गव्हाणे तिथे आले. ‘तू महापालिका निवडणुकीत नितीन लांडगेचा प्रचार का केलास असे महेश मरे यांना विचारले.  तसेच तू इकडे दिसता कामा नये असे म्हणत हाताने मारहाण करत दमदाटी केल्याचे, पोलिसांनी सांगितले. 

भाजपचे नितीन लांडगे आणि राष्ट्रवादीचे जालींदर शिंदे हे दोघे भोसरी गावठाणातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले आहेत. भाजपचे लांडगे निवडून आले आहेत. तर,  राष्ट्रवादीचे शिंदे यांचा पराभव झाला आहे. गुन्हा दाखल झालेले गोकुळ शिंदे हे राष्ट्रवादीचे उमेदवार जालींदर शिंदे यांचे चुलते आहेत. 

दरम्यान, महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. शनिवारी भाजपचे पराभूत उमेदवार राम वाकडकर यांचा भाऊ विनोद हनुमंत वाकडकर याने अक्षय तानाजी कलाटे याला निवडणुकीत कोणाचे काम केले असे विचारत मारहाण केली होती .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.