पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणार स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र चालू करण्यात येणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत सुषमा स्वराज यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र चालू करणार असल्याचे खासदार बारणे यांना पत्राद्वारे कळविले आहे, असे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहेत.

राज्यातील वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराकडे पहिले जाते. देशभरातून अनेक नागरिक मोठ्या संख्येने शिक्षण, नोकरी व इतर व्यवसायासाठी या शहरात वास्तव्यास आहेत. पुणे शहर व जिल्ह्यासाठी एकमेव पासपोर्ट कार्यालय हे पुणे शहरामध्ये आहे. हे एकच कार्यालय असल्याने उपनगरी भागात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची नागरिकांची मागणी होती. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून ही मागणी पूर्ण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने सुरू होणाऱ्या या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच चाकण, तळेगाव, हिंजवडी, लोणावळा या सारख्या वाढत्या लोकसंख्येच्या भागांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नवीन योजने अंतर्गत पोस्ट खात्याशी संलग्न असलेले पासपोर्ट सेवा केंद्र पिंपरी चिंचवड शहरात लवकरच आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून हे पासपोर्ट केंद्र चालू करणार असल्याचे खासदार बारणे यांना पत्राद्वारे कळविले आहे, असे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.