पिंपरी-चिंचवडमधील पराभूत उमेदवार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत

बॅलेटपेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी

जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत पराभूत उमेदवार आहेत. महापालिकेची बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पिंपरी येथील लोखंडे भवनात सर्वपक्षीय नेत्यांची सभा झाली. यावेळी मावळत्या महापौर शकुंतला धराडे, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, प्रशांत शितोळे, मारुती भापकर, भगवान वाल्हेकर यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते. 

ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा होऊ शकतो हे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केले आहे. जगातील बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेण्याचे टाळण्यात येत असताना आपण त्याचा वापर का करायचा, असा प्रश्न उपस्थित करत बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशिन बदलल्या जात नाहीत. याबाबत आयोगाकडे विचारणा केली असता सरकार पैसे देत नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही.

सर्व पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. याचिका दाखल करताना ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा सबळ पुरावा आपल्याकडे असला पाहिजे. पुरावा पाहून न्यायालयाला देखील धक्का बसला पाहिजे. आपल्या प्रभागाचे निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार द्यावी, असे मार्गदर्शन कोळसे-पाटील यांनी केले.

निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन नसल्या पाहिजेत, बॅलेटचा वापर करावा किंवा लोकशाही जिवंत राहण्यासाठी जी यंत्रणा चांगली आहे, त्यानुसार निवडणूक घेण्याची मागणी करावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निवडणूक आयोगाने अवमान केला आहे, अशी याचिका दाखल करावी, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचे देशातील नागरिकांना वाटत होते. त्यावेळी मोदी लाट असल्याचे म्हणत त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, ती लाट नव्हती, ती लूट होती, असे म्हणत प्रशांत शितोळे म्हणाले की, भाजपने बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेऊन निवडून येऊन दाखवावे. सगळ्या संशायास्पद गोष्टी आहेत. सबळ पुरावे घेऊन न्यायालयात याचिका दाखल करावी, असेही शितोळे म्हणाले. भाजपने निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर उमेदवारांकडून 75 लाख रुपये जमा केले होते, ते कशासाठी घेतले होते. याचे नेमके कारण गुलदस्त्यातच आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

सत्तेचा गैरवापर करून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी शुद्ध अंतःकरणाने एकत्र येऊन न्यायालयीन लढा दिला पाहिजे, असे मारुती भापकर म्हणाले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या उमेदवारांकडून नाही तर ईव्हीएम मशिनकडून पराभव झाला असल्याचे, सचिन साठे म्हणाले.

 

 

दरम्यान, येत्या काही दिवसात याविरोधात मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे.
"kolse

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.