शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या भावनेने पाहणे गरजचे – मकरंद अनासपुरे

नाम फाऊंडेशन आणि राजीव काची यांना अभिजित कदम मानवता पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीसुद्धा आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही, ही मोठी शोकांतिका आहे. दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या देशाचे वर्तमान चिंताजनक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या भावनेने पाहण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मानवता पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थात्मक कार्यासाठीचा मानवता पुरस्कार नाम फाऊंडेशनला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तो स्वीकारताना अनासपुरे बोलत होते. एक लाख रुपये आणि स्मृतिचन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यक्तीसाठीचा मानवता पुरस्कार जीवरक्षक राजेश काची यांना नारायण राणे यांच्या हस्ते देण्यात आला. 25 हजार रुपये आणि स्मृतिचन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, न्यासाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनशेठ कदम उपस्थित होते. भारती मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी दोन लक्ष 51 हजार रुपयांचा धनादेश नामसाठी मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केला.

अनासपुरे म्हणाले की, भौतिक समृद्धी वाढणाऱ्या समाजात जेव्हा खायला अन्न नसेल तेव्हाच समाजाला शेतकऱ्यांचे महत्व समजेल. भारत आणि इंडियातील वाढती दरी चिंताजनक आहे. नाम फाऊंडेशनच्या कार्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण झाली आहे.

राणे म्हणाले की, देशाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असलेला शेतकरी मात्र गरीब आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी योगदान देणे महत्वाचे आहे. आजच्या शिक्षणात संस्कार लुप्त होत चालले आहेत. स्वार्थ वाढल्यामुळे मी आणि माझे यापलीकडे जाऊन माणूस विचार करायला तयार नाही. अशांची संवेदना जागृत होणे महत्वाचे आहे.

काची म्हणाले की, या पुरस्काराने आत्तापर्यंतच्या माझ्या कार्याचे सार्थक झाले आहे. माझ्या श्वासातश्वास आणि शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत लोकांचे जीव वाचविण्याचे काम मी करीत राहणार आहे.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, ज्येष्ठ बंधू अभिजित कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशन’ या न्यासाची स्थापना 2000 मध्ये केली. अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी मानवतावादी दृष्टिकोनातून जनसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला आणि व्यक्तीला ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ प्रदान केला जातो.

या प्रसंगी डॉ. पतंगराव कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.