भोसरीतील गंधर्वनगरीत सुरक्षारक्षकाकडून चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – घरात खेळत असणा-या एका चार वर्षाच्या मुलीवर सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.24) दुपारी एकच्या सुमारास गंधर्वनगरी, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी चेतन भगवान भाकरे (वय 22, रा. भोसरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पास्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या 40 वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चेतन हा एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांची चार वर्षाची मुलगी एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपी चेतन घरामध्ये गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

रविवारी आरोपी चेतन घरासमोरून जात असताना मुलीने त्याला ओळखले. चेतन याने तिच्यासोबत केलेला अतिप्रसंग तिने आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चेतन याला अटक केली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.