लोणावळा नगरपरिषदेचा शंभर कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प एकमताने मंजुर

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेचे १०० कोटी ६७ लाख ६४ हजार ४५२ रुपये जमा व १०० कोटी १३ लाख ६९ हजार ५०० रुपये खर्च दाखविणारा ५३ लाख ९4 हजार ९५२ रुपये शिलकेचा अर्थसंकल्प २०१७ – १८ सोमवारी तुंगार्ली येथील स्वा. सावरकर विद्यालयाच्या सभागृहात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत साधकबाधक चर्चा करत व जवळपास १३ कोटी रुपयांची वाढ सुचवत एकमताने मंजुर करण्‍यात आला. यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व सर्व नगरसेवक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.


हा अर्थसंकल्प बनविताना नेहमीप्रमाणर आकड्याचा खेळ करत पंन्नास टक्क्याहू अधिक प्रमाणात फुगवटा दर्शविण्यात आला असल्याचे मागील काही वर्षाच्या जमा व खर्चावरुन दिसून येत आहे. नगरपरिषद दरवर्षी न आलेल्या विविध अनुदान व अंशदाने या हेडखालील उत्पन्न व कधीही खर्च न झालेल्या अनेक हेडखाली मोठया रक्कमा दर्शवत हा फुगवटा करत आहे. यावर्षी मात्र शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळविण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एक दिलाने काम करुन शहरात रखडलेली विकासकामे मार्गी लावू असा आशावाद नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केला.

 

नगरपरिषदेने २०१७ – १८ चा अर्थसंकल्प बनविताना विविध कर व दरांच्या माध्‍यमातून १८ कोटी १६ लाख ३३ हजार रुपये, नगरपरिषदेच्या विविध मालमत्तापासून १ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये, वृक्षकरातून २५ लाख, विविध ठेवी, वसुल्या व फी पोटी ९ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये व विविध अनुदाने व अंशदानांपोटी २५ कोटी ५६ लाख ३२ हजार रुपये अशी ५५ कोटी ८४ लाख ७२ हजार ४५२ रुपये प्रारंभिक शिल्लकेसह जमा दाखविण्यात आली आहे. वास्तवात मात्र विविध अनुदाने व अंशदाने या हेडमधील काही हेड असे आहेत की त्यांच्यापासून मागील काही वर्षात नगरपरिषदेला एकही रुपया अनुदान आलेले नाही तरी देखिल भविष्यात या हेडखाली अनुदान मिळेल ही आशेपोटी काही कोटी रुपये जमा बाजुला दाखविण्यात आले आहे.

खर्चाच्या बाजुला सामान्य प्रशासन व वसुली खर्च याकरिता ९ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये, सार्वजनिक सुरक्षिततेकरिता ९० लाख ४० हजार, नागरिकांच्या आरोग्य व सोयीकरिता २२ कोटी ३८ लाख ३८ हजार रुपये, शिक्षण क्षेत्राची निगडीत विविध कामांसाठी १ कोटी ९१ लाख ६ हजार तर अंशदाने व संकिर्णच्या विविध हेडवर ८ कोटी ९३ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. वास्तवात मात्र जमेप्रमाणेच अंशदान व संर्किण हा भांडवली खर्चाच्या हेड मधील काही हेड असे आहेत की ज्या हेडवर मागील वर्षभरात एकही रुपया खर्च झालेला नाही. तरी देखिल त्यांच्यावर काही कोटी रुपये खर्च असे दाखविण्यात आले आहे.

• खर्चाच्या विशेष तरतुदी

१) शहरातील विविध रस्ते डांबरीकरण व फुटपाथ बांधणे = ४ कोटी

२) भुमी संपादन = ५ कोटी

३) इंद्रायणी नदीपात्र सुधारण = २० लाख

४) सर्व वार्डामधील गटर बांधणे = १ कोटी

५) शहरातील सर्व उड्डाणपुल व पादचारी पुल बांधणे व नुतनीकरण = ३ कोटी

६) भुयारी गटर योजना राबविणे = १ कोटी

७) रोपवे अँम्युझमेंट पार्क व बंग्गी जंम्पिंग प्रिमियर = ३० लाख

८) शहरातील पाण्याच्या टाक्या बांधणे व लिकेज काढणे = १ कोटी

९) कचरा डेपो व्यवस्थापन = १ कोटी

१०) वलवण तलाव विकास = ४० लाख

११) कैलासनगर येथिल स्मशानभुमीत विद्युतदाहीनी बसविणे = ८० लाख

१२) महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे = २० लाख

१३) शहरातील पुतळे सुशोभिकरण = १० लाख

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.