चालू आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एलबीटी उत्पन्नाचे उद्दीष्ट होणार पूर्ण ; प्रशासनाचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चालू आर्थिक वर्षातील एलबीटी उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असून फेब्रुवारी अखेर महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 154 कोटी उत्पन्न जमा झाले आहे.

याविषयी पत्रकारांशी बोलताना एलबीटी विभागाचे अधिकारी यशवंत माने म्हणाले की, राज्य सरकारने महापालिकेला 1 हजार 300 कोटी रुपयांचे एलबीटी उत्पन्नाचे उद्दीष्ट दिले आहे. त्यानुसार महापालिकेला फेब्रुवारी अखेर 1 हजार 154 कोटी 96 लाख रुपयांचा एलबीटी जमा झाला आहे. त्यामुळे शासन सहायक अनुदान, स्टॅम्प ड्यूटी विचारात घेता यावर्षी मार्चमध्येच महापालिकेचे उद्दीष्ट पुर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2015 पासून 50 कोटींच्या पुढे उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच एलबीटी लागू केला आहे. त्यानुसार शहरात 681 व्यापाऱ्यांचा व कंपन्यांचा 50 कोटींच्या पुढे उलाढाल आहे. त्यांच्याकडून महापालिकेला सरासरी 120 कोटी दरमहा एलबीटी मिळतो. त्यात दारु उत्पादन कंपन्यानाही एलबीटी लागू केल्याने महापालिकेच्या एलबीटी उत्पन्नात 14 कोटींची वाढ झाली आहे.

महापालिकेला दरमहा शासनातर्फे सहाय्यक आनुदान स्वरुपात 61 कोटी 94 लाख रुपये मिळतात. त्याप्रमाणे महापालिकेला डिसेंबरपर्यंत एकूण 557 कोटी 46 लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून अद्याप दोन महिन्याचे अनुदान महापालिकेकडे आलेले नाही. तसेच स्टॅम्प ड्यूटीतून महापालिकेला नोव्हेंबर अखेर 78 कोटी 41 लाख रुपये मिळाले आहेत. अद्याप तीन महिन्यांची स्ट्रम्प ड्यूटी महापालिका तिजोरीत जमा झालेली नाही. त्यामुळे यावर्षी महापालिका एलबीटी उत्पन्नाचे उद्‌दीष्ट पूर्ण करेल असा प्रशासानाने विश्वास व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.