गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

मानसिक संतुलनाचे आपल्या आयुष्यातील स्थान

एमपीसी न्यूज – आपण आयुष्यामध्ये वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळ्या पद्धतीने आपल्या शारीरिक सुधारणेसाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. काही लोक आपल्या जेवणावर तर काही बाहेरच्या तयार पदार्थ खाण्यावर निर्बंध आणतात, तर काही व्यायामाचा आधार घेतात. तसेच काही जण तर प्रतिबंधक औषधं घेतात. शरीर संतुलनासाठी आपण काही ना काही करत राहतोच पण मानसिक संतुलनासाठी आपण काही करतो का? 

आपल्या मनामध्ये सतत विविध विचार चालू असतात त्याच विचारांमधून आपल्या भावनांची निर्मिती होत असते. या तयार होणाऱ्या भावनांमधूनच पुन्हा नवीन विचारांना चालना मिळते. हे असाच चक्राकार सातत्याने चालू राहते. या मन:पटलावर तयार होणाऱ्या भावना आपल्याला आयुष्यात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन दाखवून देतात. हीच विचार आणि भावनांची चक्राकार व्यवस्था आपले आयुष्य घडवत असते. आपल्या स्वभावाची निर्मितीसुद्धा याच विचारांच्या गुंतागुंतीमधून होत असते. 

सर्वसाधारणपणे आपले मन हे आपल्या मेंदूत अथवा हृदयात असते अशी आपली समजूत असते पण खरे तर आपले मन शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असते. म्हणजे बघा ना मला आत्ता कसलीतरी भीती वाटायला लागली तर मला घाम येतो, हृदयाचे ठोके वाढतात. पण वर्तमानात माझ्या समोर भीती वाटण्यासारखे काहीच घडले नाही तरी या भावनांचे शरीरावर परिणाम किंवा पडसाद दिसतात. म्हणजेच आपले मन हे सर्व शरीरात असते असे म्हणायला हरकत नाही. याप्रमाणे आपल्या मनात तर एका वेळी कितीतरी विचार चालू असतात त्यातून वेळोवेळी विविध भावनाही प्रकट होत असतात. या सगळ्याचा शरीरावर नक्कीच काही परिणाम होत असणारच ना? सध्याचा धावपळीच्या युगात सतत आढळून येणारे डायबेटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक अशा प्रकारच्या आजारांचे मूळही याच भावनिक गुंतागुंतीमधून तयार होतात. 

याच सर्व कारणांमुळे मानसिक संतूलनाला आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान देण्याची गरज आहे. म्हणजे बघा ना स्वभावाला औषध नाही म्हणतात पण मानसिक संतुलनामधून आपण नक्कीच आपले विचार, भावना, आणि त्यातून तयार होणारा स्वभाव बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो. प्रयत्नाच्या सातत्याने स्वभावात नक्कीच बदल घडू शकतात. 

मानसिक संतूलन विचार, भावना व स्वभावाप्रमाणे अजून काही गोष्टी सुधारण्यासाठी मदत करू शकते त्या अशा 
1. प्रेरणा 
2. दृष्टिकोन 
3. व्यक्तिमत्व 
4. सतत शिकण्याची आस 
आपण स्वतःमध्ये नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकतो फक्त त्याला प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता आहे. 

(क्रमशः)
 
जीवन वैशंपायन
मनो विकास तज्ज्ञ
9822024674
Latest news
Related news