वंचित मुलांसोबत प्रेमाने दोन घास खाणे हे श्रीमंतीचे लक्षण – रेणू गावस्कर

अनुबंध सेवा प्रतिष्ठानतर्फे रोटी डे निमित्त कार्यक्रम
एमपीसी न्यूज – रस्त्यावरील एक मुल सामाजिक संस्थेत आल्यावर त्याचे पुनवर्सन संस्थेमार्फत होते. परंतु त्या एका मुलाच्या तुलनेत रस्त्यावर अजूनही शंभर मुले आहेत. सामान्यांमध्ये या विषयाबद्दल जेव्हा अस्वस्थता वाढेल, तेव्हा समाजपरिवर्तन होईल. वंचितांसोबत एकत्र जेवण करणे, ही रोटी डेची वेगळी वाटचाल आहे. आज सामान्य नागरिकांनी वंचित-विशेष मुलांना वात्सल्याने दोन घास भरविले. याप्रमाणे भविष्यात ही मुले गरजूंना नक्कीच मदतीचा हात देतील. त्यामुळे या मुलांसोबत प्रेमाने दोन घास खाणे हे श्रीमंतीचे लक्षण म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी केले.
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे मंडईतील एकलव्य शिक्षण संस्थेतील मुलांसोबत रोटी डे निमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, वनिता जाधव, अथर्व जाधव, शेखर भागवत, दीपक काळे, महेश पारशिवनीकर, अनिल साप्ते, गुरुदेव साप्ते, सुरेश ठनके, योगेश कोलन आदी उपस्थित होते.
रेणू गावस्कर म्हणाल्या की, प्रत्येक माणसाची अन्न ही मुलभूत गरज आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाचे पोट भरतो. त्याप्रमाणे समाजातील एका गरजूला मदत करायला हवी. मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित संकटांना रस्त्यावरील लोकांना तोंड द्यावे लागते. अशा गरजू स्त्रिया आणि मुलांकरीता रोटी डे ची संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. आपण सर्वांनी प्रतिज्ञा करुया की केवळ एकच दिवस नाही, तर वर्षभर हा उपक्रम राबवू.
अशोक जाधव म्हणाले की, एकलव्य संस्थेतील चिमुकल्या एकलव्यांसाठी रोटी डेच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. भविष्यात या मुलांनी सक्षम होऊन शिक्षण घ्यावे आणि आपल्या पायावर उभे रहावे, याकरिता रोटी डेचा कार्यक्रम हा पाया आहे. शारीरिक क्षमता वाढविल्याशिवाय शिक्षणाकडे मुलांनी वाटचाल करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रस्टतर्फे असे उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येत आहेत.