पंचायत समिती ते लोकसभा एकच सरकार असावे म्हणून भाजपला मते – बाळा नांदगावकर

शिवसेना मनसे युतीची शक्यता

एमपीसी न्यूज – भाजपला राज्यभरात चांगले यश मिळाल्याचीही कबुली देत लोकांनी पंचायत समिती ते लोकसभा एकच सरकार असावे म्हणून भाजपला मते दिली हे मान्य करावे लागेल, असे मत मनसेचे नेते व माजी आमदार यांनी आज (बुधवार) वाडेश्वर कट्ट्यावर नोंदवले. मात्र, यंदा ईव्हीएम मशिनबाबतही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी सूचक प्रतिक्रियाही विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी दिली.

 

त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसे यांची युती होण्याच्या शक्यता वाढल्या असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) भूमिका ही मराठी माणसाच्या हिताची असेल, असे नांदगावकर यांनी सांगितले होते. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. त्रिशंकू परिस्थितीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणे किंवा स्वतंत्र उमेदवार उभा करणे अशा पर्यायांवर काँग्रेस विचार करीत आहे. काँग्रेसचे 31, तर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. हे 40 सदस्य तटस्थ राहिले, किंवा त्यांनी मिळून स्वतंत्र उमेदवार उभा केला तर त्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. अशावेळी शिवसेना अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदावर कब्जा करू शकते.

 

यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी विचारले असता आपल्या पक्षाची भूमिका ही मराठी माणसाच्या हिताचीच राहील, असे नांदगावकर यांनी सांगितले होते. मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील. राज ठाकरेंचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईत निवडून आलेल्या मनसेच्या सात नगरसेवकांचा पाठिंबा सेनेला मिळण्याची शक्यता वाढली होती.

महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी युती करण्यासाठी शिवसेनेसमोर हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेने राज यांना टाळी द्यायचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना शिवसेनेला मनसेचे म्हणणे पटले. त्याचा आम्हाला आनंद असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.