एमपीसी न्यूज – गरजु व्यक्तींपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी काल (1 मार्च) रोजी राबविण्यात आलेल्या रोटी डे ला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटक्षेत्रातील दिग्गजांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे.
रोटी डे च्या निमीत्ताने काल पुणे शहरातील अनेक संस्थांनी धान्य वाटप आणि रोटी वाटप यासारखे उपक्रम आयोजित केले होते. पुण्यातीलच अमित कल्याणकर या युवकाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
यावर्षी अखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि साहित्य परिषद, एकपात्री कलाकार संघ, हडपसर कलाकार संघ या विविध संस्थांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही हा उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत मोठ्या संख्येने रोटी वाटप करण्यात आले. गरजू संस्थांना धान्य वाटप करण्यात आले. रोटी डे या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून पाठींबा लाभला. तरुण आणि जेष्ठ नागरिकांसोबतच लहान मुलांनीही या उपक्रमात योगदान दिले.
याविषयी बोलताना अमित म्हणाला, आम्ही काल सकाळपासून रोटी डे साजरा करण्यास सुरवात केली. सर्वप्रथम माऊली केंद्रापासून धान्य वाटपाला सुरवात केली. त्यानंतर पुणे, आळंदी परिसरातील अनेक गरजू लोकांपर्यत यानिमीत्ताने आम्ही पोहोचु शकलो. सलग दुस-या वर्षीही मिळालेला प्रतिसाद पाहता समाधान वाटत असल्याची भावना त्याने बोलून दाखविली.