अविनाश प्रभुणे यांना सजग नागरी माहिती अधिकार पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- सजग नागरिक मंचाच्या वतीने देण्यात येणारा ‘सजग नागरी माहिती अधिकार पुरस्कार’ नागपूर येथील अविनाश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे.
पुण्यातील आयएमडीआर सभागृहात रविवारी (दि.5) सायंकाळी पाच वाजता माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते अविनाश प्रभुणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
माहिती अधिकार कायद्याला अकरा वर्ष पुर्ण झाली आहेत. या कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने पुण्यात सजग नागरिक मंचाची स्थापना केली. या मंचाच्या माध्यमातून माहिती अधिकार जागृती, प्रबोधन, मार्गदर्शन, प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात.
माहिती अधिकार कार्यकर्ते गेल्या 10 वर्षापासून माहिती अधिकाराचा वापर करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत आहेत. समाजातर्फे त्यांच्या मौलिक कार्याची नोंद घेतली जावी, त्यांचे कौतुक व्हावे आणि इतरांना त्यापासून स्फूर्ती मिळावी, यासाठी ”सजग नागरीक माहिती अधिकार पुरस्कार” देण्यात येत आहे.
अविनाश प्रभुणे यांनी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर व पाठपुरावा करुन समाजाचे अनेक प्रश्न धसास लावले आहेत. महावितरण, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोस्ट सेवा, आधार कार्ड यातील त्रुटी, गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी सातत्याने माहिती अधिकाराचा वापर केला आहे.