विजेच्या धक्याने मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबियास आर्थिक मदत

महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने साडेचार लाख रुपयांची मदत 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील टोळी क्र. 465 मधील महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माथाडी कामगाराचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या कामगाराच्या कुटुंबियास माथाडी बोर्ड व कामगारांच्या वतीने साडेचार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील टोळी क्र. 465 मधील महाराष्ट्र मजदूर संघटनेचा सभासद माथाडी कामगार रविंद्र मोहन गाडे यांचा दोन महिन्यापुर्वी खेड तालुक्यातील खरपुडी येथे विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपरी येथील टाटा मोटर्समध्ये ते काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी शितल, दोन मुले असा परिवार आहे. त्यांची आर्थिक परस्थिती अंत्यत हलाखीची आहे. 

गाडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी पुढाकर घेतला. महाराष्ट्र मजदूर संघटना, टोळी क्रमांक 465 मधील कामगार आणि पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डाच्या वतीने रविंद्र गाडे यांच्या पत्नी शितल गाडे व त्यांच्या कुटुंबियांकडे चार लाख 50 हजार रुपयांचा धनादेश सुपुर्त करण्यात आला. 

चिंचवड, शाहुनगर येथील संघटनेच्या कार्यालयात बुधवारी (दि.1) ही मदत देण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, पांडूरंग कदम, भिवाजी वाटेकर, सर्जेराव कचरे, अमृत शिंदे, गोरक्ष दुबाले आदी उपस्थित होते.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.