एमपीएमए इलेव्हनचा शानदार विजय

लक्ष्मी रोड रॉयल्स, इन्फ्राकॉन इलेव्हनची प्रतिस्पर्ध्यावर मात

 फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा 2017

एमपीसी न्यूज – शशांक जोशी आणि अमित ठक्करच्या आक्रमक अर्धशतकानंतर सचिन राठीने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमपीएमए इलेव्हन संघाने फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत स्टोन स्ट्रायकर्स संघावर 22 धावांनी मात केली. लक्ष्मी रोड रॉयल्स, इन्फ्राकॉन इलेव्हन या संघांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.


पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित ही स्पर्धा मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. एमपीएमए इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 1 बाद 111 धावा केल्या. यात शशांक जोशी आणि अमित ठक्कर जोडीने 89 धावांची सलामी दिली. अमितने 29 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारसह 52 धावांची खेळी केली.

यानंतर शशांकने डावाची सूत्रे हाती घेत एमपीएमए संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. शशांकने 27 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 52 धावा केल्या. यानंतर एमपीएमए इलेव्हनच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून स्टोन स्ट्रायकर्स संघाला 5 बाद 89 धावांतच रोखले. स्ट्रायकर्सकडून भावेश दोरीने सर्वाधिक नाबाद 26 धावा केल्या. एमपीएमएकडून सचिन राठीने 3 गडी बाद केले.

दुस-या लढतीत पुष्पक इन्फ्राकॉन संघाने युनिबिक संघावर 10 विकेटनी दणदणीत विजय मिळवला. युनिबिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. युनिबिक संघाने 8 बाद 72 धावा केल्या. इन्फ्राकॉनच्या योगेश शाहने 2 षटकांत अवघ्या 4 धावा देत 3 गडी बाद केले. यानंतर पुष्पक इन्फ्राकॉन संघाच्या सलामी जोडीने 5 षटकांतच विजयी लक्ष्य साध्य केले.  प्रसान शाहने 12 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 32, तर हितेश जैनने 19 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह नाबाद 28 धावा केल्या.

तिस-या लढतीत लक्ष्मी रोड रॉयल्स संघाने मशिनरी मास्टर्स संघावर 67 धावांनी विजय मिळवला. लक्ष्मी रोड रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 96 धावा केल्या. दिजेश शाहने 27 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 48 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मशिनरी मास्टर्स संघाला 7 बाद 29 धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक – 1) एमपीएमए इलेव्हन – 10 षटकांत 1 बाद 111 (शशांक जोशी नाबाद 52, अमित ठक्कर 52, रिषभ चोप्रा 1-17) वि. वि. स्टोन स्ट्रायकर्स – 10 षटकांत 5 बाद 89 (भावेश दोरी नाबाद 26, देनिश पटेल 24, सचिन राठी 3-19, श्रीधर बारोट 1-9). सामनावीर – शशांक जोशी.

2) पीआ पॉवर्स – 10 षटकांत 6 बाद 67 (भरत ओसवाल 20, निखिल मुथा 12, नितीन ओसवाल 3-7, आकाश ओसवाल 1-11, राहूल जैन 1-3) पराभूत वि. ओएनवायएक्स स्ट्रायकर्स – 8.2 षटकांत 6 बाद 68 (राहूल जैन 39, नितीन ओसवाल 10, दिनेश कुकरेजा 4-15). सामनावीर – राहूल जैन.

3) लक्ष्मी रोड रॉयल्स – 10 षटकांत 4 बाद 96 (दिजेश शाह नाबाद 48, अमित शाह 13, केतन परमार 13, सुनील फाळके 1-17) वि. वि. मशिनरी मास्टर्स – 10 षटकांत 7 बाद 29 (मयूर बोरसे नाबाद 13, रमेश बसंतानी 2-4, केतन परमार 1-5, जयंत भोसले 1-5). सामनावीर – दिजेश शाह.

4) युनिबिक – 10 षटकांत 8 बाद 72 (श्याम कडू नाबाद 21, शशांक पाटसकर नाबाद 18, विनित राठी 14, योगेश शाह 3-4, सतिश जैन 1-10) पराभूत वि. पुष्पक इन्फ्राकॉन इलेव्हन – 5 षटकांत बिनबाद 73 (प्रसान शाह नाबाद 32, हितेश जैन नाबाद 28). सामनावीर – योगेश शाह.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.