डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेला पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे येत्या शनिवारपासून (दि. 4) सुरुवात होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित या स्पर्धेत एकूण 21 संघ सहभागी होत आहेत. यामध्ये 4 बाहेर गावचे संघ, 17 स्थानिक संघ सहभागी झाले आहेत.


संयोजन समितीचे अध्यक्ष सुनील गुगळे म्हणाले की, शासनातर्फे क्रीडा धोरणाला नेहमीच प्रोत्साहन देण्यात आले आहे. म्हणूनच राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी क्रीडा प्रकारामध्ये प्रोत्साहन म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणार्‍या या स्पर्धेच्या फेर्‍या बाद पद्धतीने होणार असून ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्राच्या मान्यतेखाली होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 12 मार्च रोजी होणार आहे.

स्पर्धेमध्ये विजेत्या आणि उपविजेत्या तसेच तिसर्‍या क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम व पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, रक्षक, मध्यरक्षक, स्ट्राईकर अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे, असे मनोज भोर यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा इलेव्हन, कोल्हापूर जिल्हा, मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पोलीस संघ व युनियन बँक ऑफ इंडिया-मुंबई हे बाहेर गावचे संघ सहभागी होणार आहेत.

संयोजन सचिव वसंत मोरे यांनी सांगितले की, मध्य रेल्वे (पुणे विभाग), ग्रीन मेडोज्, विक्रांत वॉरीयर्स, पुणे मॅगीसिअन, रेल्वे पोलीस पुणे, हॉकी लव्हर्स, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हॉकी युनायटेड, राज्य राखीव पोलीस दल, अस्पत अ‍ॅकॅडमी, खडकी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी, चिखलवाडी यंग बॉईज, प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटर-खडकी, फ्रेन्डस् युनियन, पीसीएमसी इलेव्हन, आयकर विभाग व सेंट्रल एक्साईज व किड्स इलेव्हन हे स्थानिक संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे संचालक स्टॅनली डिसुझा व अंपायर मॅनेजमेंट श्रीधरण तांबा यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहराचे महापौर प्रशांत जगताप, डेप्युटी मेयर मुकारी अलगुडे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ अमोल जगताप, स्थानी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष हितेश जैन यांच्या उपस्थित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.