महावितरणकडून चाळीस हजारांवर थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

कारवाईची धडक मोहीम सुरुच राहणार

एमपीसी न्यूज – वीजबिलांच्या थकबाकीदारांविरोधात सुरु असलेल्या धडक मोहिमेत गेल्या महिनाभरात पुणे परिमंडलातील 40, हजार 268 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे परिमंडलात या महिन्यातही थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू राहणार आहे. गेल्या महिन्याभरात 19 कोटी 75 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 40, हजार 268 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे या थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरू करून घ्यावा लागत आहे.

तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे तसेच थकबाकीच्या वसुलीमध्ये हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. थकबाकीदारांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून राज्यभरात ही महामोहीम सुरू आहे.

पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेल्या कारवाईची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेली वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून थकबाकीदारांना करण्यात आले आहे.

महावितरणने अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग सुरू केलेले आहे. ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना वीजबिलांचा तपशील एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. तसेच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.