ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापूरमध्ये हत्या

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. कृष्णा किरवले यांची राहत्या घरी अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी कोल्हापूर येथे घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. कृष्णा किरवले यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा देशभर जागर केला. आंबेडकरी तत्त्वज्ञान, चळवळ व दलित साहित्याच्या भाष्यकारांमध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून त्यांना ओळखले जात होते. डॉ. किरवले हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अॅण्‍ड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशी पदे त्यांनी भुषवली होती. प्रख्यात पुरोगामी विचारवंत अशी त्यांची ओळख होती.

डॉ. किरवले हे 2012 साली जळगावात पार पडलेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आंबेडकरी जलसावर त्यांनी ऐतिहासिक संशोधन केले असून दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागूल अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डॉ. कृष्णा किरवले यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार तेथेच झाले. 1967 पासून आंबेडकरी ऊर्जा देणा-या डॉ. गंगाधर पानतावणे संपादित अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.

कोल्हापूरातील म्हाडा कॉलनीतील राजेंद्रनगर परिसरात त्यांचे घर आहे. त्यांच्या बेडरूममध्येच त्यांचा अज्ञातांनी गुरुवारी चाकूने वार करून खून केला. त्यांच्या पत्नी रुमकडे गेल्या असता डॉ. किरवले मृत अवस्थेत आढळून आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राजारामपूरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी 2015 मध्ये कोल्हापूरातीलच पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांची अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली. या प्रकरणाला दोन वर्ष झाले तरी मारेकरी अद्यापर्यंत सापडले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.