पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी नागरिकांना नोंदवता येणार ‘ऑनलाईन’ प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड शहर कसे स्मार्ट बनवता येईल त्यासाठी तुम्ही आता घरबसल्याही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. केंद्र सरकारने यासाठी खास माय गव्हर्नमेंट (mygov.in) या ऑनलाईन पोर्टलचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये नागरिकांना ऑनालाईन पद्धतीने  शहराला स्मार्ट सिटी प्रकल्पातून नेमके काय अपेक्षित आहे, याबद्दल आपले मत मांडता येणार आहे.


पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला  आहे.  त्यासाठी सध्या प्रशासनातर्फे शहरासाठी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव बनविण्याचे काम चालू आहे. त्यासाठी नागरिकांचे हे मत अत्यंत महत्वाचे आहे. कारण नागरिकांच्या सूचना व सल्ल्याद्वारेच पिंपरी-चिंचवड कसे स्मार्ट बनविता येईल यासाठी केंद्र सरकार व महापालिका प्रशासन स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करत  आहे.


नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून हा प्रस्ताव बनवला जात असून त्यासाठी प्रत्यक्ष भेटून, चर्चासत्रातून अभिप्राय घेतले जात आहेत. ज्यांना भेटून चर्चा करणे शक्य नाही मात्र शहराला स्मार्ट बनविण्यासाठी हातभार लावायचा आहे,अशा इच्छुक नागरिकांना आता ऑनलाईन पद्धतीनेही आपले अभिप्राय घर बसल्या  देता येणार आहेत. यासाठी नागरिकांना mygov.in या पोर्टलवर किंवा https://goo.gl/UMDtav लिंक वर जाऊन  कॉमेंट बॉक्समध्ये #PCMC असे टाईप करुन त्यापुढे आपल्या सूचना, कल्पना, अपेक्षा आदी नोंदवता येणार आहेत.

या प्रस्तावासाठी खासगी क्रिसिल या खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या सर्वेक्षणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करत आहे. यामध्ये नागरिकांची चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत,  काही ठिकाणी घरोघरी जाऊन स्मार्ट सीटीबाबात त्यांच्या कल्पाना जाणून घेण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात आहेत.क्षेत्रीय कार्यालयांवरही एक मतपेटी ठेवली आहे जिथे नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया लिहून त्या पेटीत टाकू शकतात. तसेच आता ऑनलाईन प्रतिक्रियाही नागरिकांना नोंदविता येणार आहेत.

नागरिकांना या प्रतिक्रियामध्ये तुमच्या शहराच्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमचे शहर आवडते हे सांगायचे आहे, तसेच शहरातील कमतरता काय आहेत, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील कोणत्या भागाचा विकास होणे अपेक्षित आहे. तो का व कसा याचे  कारण. या सा-या मुद्यांवर तुमची प्रतिक्रिया तुम्हाला नोंदवता येणार आहे.

काही नागरिकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया द्यायला सुरुवातही केली असून त्यामध्ये शहरातमध्ये पादचारी मार्ग हवेत, सायकल मार्ग हवेत, कचरा व्यवस्थापन हवे, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम हवी अशा स्मार्ट सिटीबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.