बापू नायर टोळीतील कुख्यात गुंड दत्ता माने गजाआड

एमपीसी न्यूज – बापू नायर टोळीतील मोक्का गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड दत्ता माने याला  भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई दौंड, पुणे येथून करण्यात आली.

 

भारती विद्यापाठ पोलीस हद्दीत गस्त घालत होते. बापू नायर टोळीतील मोक्का गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड दत्तात्रय उर्फ दत्ता बाळू माने (वय 29, रा. बालाजीनगर, पुणे) हा दौंड येथे राहत असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार यांना  खब-यामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. दत्ता माने हा दौंड येथे कोठे राहत आहे. हे त्याच्या हस्तकाला माहित असून तो रायगड येथील माणगावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दत्ता माने याच्या हस्तकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दत्ता माने याच्याविषयी चौकशी केली. दत्ता माने दौंड येथे कोठे राहत आहे, ते माहित असल्याचे त्याच्या हस्तकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला घेऊन दत्ता माने दौंड येथे राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

 

दत्ता माने हा बापू नायर टोळीतील सक्रिय सदस्य आहे. त्याच्यावर दोन खून, दोन खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण करणे, असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बालाजीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी परिसरात तो दहशत माजवित असल्याचे, पोलिसांनी सांगितले. गेल्या सात महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

 

भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.