माऊली दाभाडे यांच्या हकालपट्टीचा राष्ट्रवादीच्या बैठकीत ठराव

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर

 

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत आज (शनिवारी) मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी दाभाडे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करावी, असा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे मावळात राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे हा ठराव पाठविण्यात येणार आहे.

 

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज (शनिवारी) वडगाव येथे बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री मदन बाफना, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, अतिष परदेशी, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, महादू कालेकर, मंगेश ढोरे, युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिला अध्यक्षा शुभांगी राक्षे, सीमा बालगुडे, गंगाधर ढोरे, सुभाषराव जाधव, सुनील ढोरे, सुनील भोंगाडे, तानाजी पडवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मावळ तालुका राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. या गटबाजीला अजित पवारही वैतागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना स्वत:चा मोबाईल नंबर देऊन, कोणी पक्षविरोधी  काम करत असेल तर मला फोन करून सांगा, असे आवाहन केले होते. तसेच पक्षविरोधी काम करणा-याची हकालपट्टी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते.

 

जिल्हा परिषद निवडणुकीत बाबूराव वायकर, नारायण ठाकर, दत्तात्रय पडवळ, राजेंद्र कुडे, तुकाराम आसवले यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यानंतर माऊली दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोषणा केली आणि यातील चार उमेदवरांबरोबर प्रचारातही सहभागी झाले. दाभाडे गेल्या 25 वर्षांपासून पक्षा विरोधात काम करत आहेत. भाजपला पोषक अशी त्यांची भूमिका असते. स्वतंत्र पक्षाची घोषणा करून दाभाडे यांनी पक्षविरोधी काम केले आहे. त्यामुळे दाभाडे यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करावी, असा ठराव एक मताने पारित केला असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मजबूत आहे. आपल्या विरोधी माणूस गेला तरी कार्यकर्ते त्यांचे काम करत होते. आता परिस्थिती बदलली, असे सांगत मदन बाफना यांनी भाजप सरकावर टीका केली. भाजपवाले म्हणतात आम्ही पारदर्शक कारभार करत आहोत. भ्रष्टाचारमुक्त सरकार करायचे असेल तर सुरुवात तुमच्यापासून करा. जाहिरातींवर किती खर्च केला हे जनतेसमोर येऊ द्या, असेही ते म्हणाले. माऊली हे ‘मोडू’ काका आहे ‘करू’ काका नाही. त्यांनी पक्ष मोडायचे काम केले. गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी पक्ष विरोधी काम केले, अशी टीकाही त्यांनी केली.

 

विठ्ठल शिंदे म्हणाले, पाच वर्षांनी साथीचा रोग येत असतो. मतदारांनी आपल्याला स्वीकारले नाही. काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. पक्ष संघटनेला बाधा येईल, असे वर्तन करू नये. कारभारावर अंकुश ठेवणे महत्वाचे आहे. 

 

यावेळी अमोल केदारी, शिवाजी असवले, विठ्ठल जाधव, सोमनाथ पवळे, नंदकुमार धनवे, पोपट चव्हाण, वाडेकर, भरत भोते, दीपक हुलावळे यांचीही भाषणे झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी व पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे, सुनील ढोरे, शिवाजी असवले, प्राजक्ता आगळे, प्रकाश आगळमे, अलका येवले, कविता काळे, मंगल आढाव, शोभा कदम, कुसुम काशीकर, उर्मिला गावडे, दत्तात्रय शेवाळे, साहेबराव कारके, राजश्री राऊत, महादू उघडे यांचा समावेश होता.

 

तानाजी पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. तर, मंगेश ढोरे  यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.