लैंगिक छळ रोखण्यासाठी महिलांनी निर्भयपणे पुढे यावे – शकुंतला जयसिंगानी

केजे महाविद्यालयातर्फे ‘लैंगिक छळ : प्रतिबंध आणि निवारण’वर चर्चासत्र

एमपीसी न्यूज – कामाच्या ठिकाणी, शिक्षणसंस्थांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखायचा असेल, तर पुरुषी मानसिकतेच्या दबावाला बळी न पडता मुली व महिलांनी निर्भयपणे प्रत्युत्तर द्यायला हवे. लैंगिक छळाच्या बाबतीत असलेला कायदा समजून घेऊन स्वसंरक्षणासाठी सक्षम बनावे, पुरुषांनी स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे, असे मत ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शकुंतला जयसिंगानी यांनी व्यक्त केले.

 

केजेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट रिसर्चच्या वतीने आयोजित ‘कामाच्या ठिकाणावरील लैंगिक छळ (प्रतिबंध व तक्रार निवारण)’ या विषयावरील चर्चासत्रात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी उचित माध्यमाचे प्रमुख जीवराज चोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी पॉलिटेक्निचे प्राचार्य जे. के. वारके, प्रा. प्रतिभा चव्हाण, डॉ. पी. एन. देशमुख, डॉ. व्ही. जे. काखंडकी आदी उपस्थित होते.

 

शकुंतला जयसिंगानी म्हणाल्या की, आपण काम करीत असलेल्या ठिकाणी अथवा शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी सजग राहायला हवे. तसेच माणसांना ओळखता आले पाहिजे. कायद्याने आपल्याला खूप चांगले संरक्षण दिले आहे. मात्र, अनेक महिला पुढे येऊन या छळाचा विरोध करीत नाहीत. परिणामी  पुरुषांचे धाडस वाढते व छेडछाड एखाद्या कठीण प्रसंगावर येऊन पोहोचते. त्यामुळे वेळीच आपण निर्भयपणे प्रतिकार केला पाहिजे. कायद्यातील तरतुदी वाचून संबंधित समितीकडे तक्रार नोंदवली पाहिजे.

 

जीवराज चोले म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हायला हवी. मुली-महिलांनी निर्भिडपणे तक्रार नोंदवावी. स्थानिक पातळीवर अथवा पोलिसांनी दखल घेतली नाही, तर अशा स्थितीत माध्यमांची मदत घ्यायला हरकत नाही. पीडितेची ओळख गुप्त ठेवून माध्यमे अन्यायाविरोधात लढतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य पाऊल उचलले तर भविष्यात ओढवणारा प्रसंग टाळता येऊ शकेल.

 

डॉ. सुहास खोत यांनी कायद्यातील तरतुदी आणि होणाऱ्या  शिक्षेविषयी माहिती दिली. प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी  महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.