महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये आयुर्वेद-होमिओपॅथीसाठी उभारणार ‘संशोधन केंद्र’

एमपीसी न्यूज – आयुर्वेद-होमिओपॅथी आणि अभियांत्रिकीच्या संशोधनासाठी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘संशोधन केंद्र’ उभारण्यात येणार आहे. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसाठी व डॉक्टरांसाठी, तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी या केंद्राचा उपयोग होईल. येत्या शैक्षणिक वर्षात (2017-18) हे नवे संशोधन केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव प्रा. एस. जी. कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याप्रसंगी सोसायटीचे कार्यकारी संचालक (वैद्यकीय सेवा) डॉ. संतोष काकडे, धोंडूमामा साठे होमीओपॅथीक मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रदीप सेठिया, प्रा. शंतनू कानडे, प्रफुल्ल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

प्रा. एस. जी. कानिटकर म्हणाले की, सोसायटीचे संजीवन रुग्णालय, रानडे होमिओपॅथी रुग्णालय आहे. होमिओपॅथी व अॅलोपॅथी यांच्या  संशोधनातून  रुग्णाला स्वस्त दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय संशोधनासाठीचे केंद्र पुण्यात असेल. प्रदूषण आणि त्यासारख्या गंभीर समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन व्हावे, यासाठी अभियांत्रिकी संशोधन केंद्राचा उपयोग होईल.  हे केंद्र सांगली येथील संस्थेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात असेल.

 

देशातली पहिली राष्ट्रीयीकृत बँक म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना करणाऱ्या धोंडूमामा साठे या मराठी माणसाने 1945 साली दत्तो वामन पोतदार आणि इतर सहकाऱ्यांच्या बरोबरीने शिक्षणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा पाया रचला. आज सोसायटीचा विस्तार झपाट्याने होत आहे. गेल्या वर्षीच सोसायटीच्या वतीने पुण्यात कनिष्ठ महाविद्यालयही सुरू केले आहे. या महाविद्यालयाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून, सर्व प्रवेश पूर्ण होत आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाची गरज ओळखून साठे यांनी सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले, असेही त्यांनी सांगितले.

 

शैक्षणिक कार्याबरोबरच संस्थेने कायम समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेची जागृती करणारा कार्यक्रम संस्थेतर्फे राबविला जात आहे. यासाठीचे अनेक सेमिनार पुणे आणि सांगली परिसरात सुरू आहेत. पुण्यात 20 पेक्षा अधिक असे सेमिनार करण्याचा मानस आहे. सांगली येथे मराठी भाषा संवर्धनासाठी नवीन मराठी शाळा ही मराठी शाळा संस्थेच्या वतीने चालविली जात आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती संस्थेतर्फे दिली जात असल्याचे डॉ. संतोष काकडे  यांनी सांगितले.

 

सोसायटीच्या अनेक इन्स्टिट्यूटपैकी एक असलेल्या एमबीए आणि पीजीडीएचएम अभ्यासक्रमाच्या वतीने येत्या 8 एप्रिल 2017 रोजी ‘करिअर इन हेल्थकेअर मॅनॅजमेन्ट ‘वर विशेष सेमिनार आयोजिला आहे. भविष्यात संस्थेच्या वतीने पुण्यात टेक्नॉलॉजी एक्स्प्लोरेटरी अॅण्ड सायन्स पार्क, विधी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. होमिओपॅथी ही अतिशय चांगली उपचारपद्धती असून, आधुनिक काळातही त्याचे महत्व पटवून देण्यासाठी व सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात ही उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीच्या वतीने नेहमीच पुढाकार घेतला आहे, असे डॉ. सेठिया म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.