विकास कामे करुनही जनतेने नाकारल्याची अजितदादांना खंत

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक 
 
दोन दिवसात गटनेता जाहीर केला जाणार 


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आणि पदाधिका-यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवारी) पुण्यात बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या दारुण झालेल्या पराभवाचे या बैठकीत आत्मचिंतन करण्यात आले. विकास कामे करुनही पिंपरी-चिंचवडमधील जनतेने नाकारल्याची खंत अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केली. 

पुण्यातील बारामती होस्टल येथे झालेल्या बैठकीला शहाराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची अजित पवार यांनी ओळख करुन घेतली. त्यानंतर नेत्यांची बैठक झाली. महापालिकेत झालेल्या दारुण पराभवाची बैठकीत कारणमीमांसा करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडचा राष्ट्रवादीने कायापालाट केला आहे. तरीही जनतेने राष्ट्रवादीला नाकारले असून जनतेचा कौल राष्ट्रवादीला मान्य आहे. पराभव स्वीकारुन सगळ्यांनी पुन्हा जोमाने पक्षांचे काम सुरु करावे. ज्या भागात कमी पडलो आहोत. तिथे कामे करावीत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव अपेक्षित नव्हता, असे अजित पवार बैठकीत पदाधिका-यांशी बोलताना म्हणाले. 

बैठकीमध्ये गटनेतेपदासाठी योगेश बहल, मंगला कदम, अजित गव्हाणे, नाना काटे, वैशाली घोडेकर, दत्ता साने यांच्या नावावर चर्चा झाली. त्यांच्यापैकी एकाची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. येत्या दोन दिवसात गटनेता जाहीर केला जाणार आहे. राष्ट्रवादीचा गटनेता हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची पुढील आठवड्यात एक बैठक घेण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. भाजपने राष्ट्रवादीला धुळ चारत एकहाती सत्ता मिळविली आहे. विकास कामांच्या जोरावर पिंपरीत राष्ट्रवादी हॅटट्रिक करेन असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास होता. मात्र, भाजपच्या लाटेत राष्ट्रवादीची दाणादाण उडाली.
"advt"
 
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.