परिचारक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; माजी सैनिक विकास संघाची मागणी

माजी सैनिक विकास संघाकडून आमदार परिचारक यांचा निषेध

एमपीसी न्यूज – देशाच्या सुरक्षेत गुंतलेल्या जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणा-या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, त्रिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी केली आहे.

पुण्यातील घोरपडी जवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळील महासैनिक लॉन्सच्या सभागृहात त्रिशक्ती फाऊंडेशन व माजी सैनिक विकास संघाची निषेध सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष   सुभेदार मेजर (निवृत्त ) अशोक  काशीद, निवृत्त जनरल डी. बी. शेकटकर, निवृत्त जनरल वेंकी पाटील, निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, भोलासिंग अरोरा, विकास पासलकर, इन्शा पठाण, नगरसेवक रवींद्र माळवदकर, उत्तमराव शिंदे, माणिक  मोकाशी, नूर खान, हाजी याकूब, सागर पवार, मायकल साठे, रणजितसिंग अरोरा, प्रताप राणा यांच्यासह लष्करातील निवृत्त अधिकारी व सैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व वक्त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध व्यक्त केला.


जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील एका जाहीर सभेत सैनिकांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा देशभरातून निषेध केला जात आहे.

 

यावेळी बोलताना निवृत्त कर्नल संभाजी पाटील म्हणाले की, देशाच्या सीमेवर रक्षण करणा-या सैनिकांच्या पत्नीबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार परिचारक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परिचारक यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून त्या स्वाक्षरी राज्यपाल विद्यासागर राव यांना पाठविण्यात येणार आहेत.

हा व्यक्ती वाद नसून प्रवृत्ती वाद आहे. आता रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आहे, असेही  पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सभेचे सूत्रसंचलन भोलासिंग अरोरा यांनी केले.
"advt"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.