सोनी टीव्हीने मालिकेत परस्पर पेंटिंग वापरल्याचा मोशीतील चित्रकाराचा आरोप

एमपीसी न्यूज – सोनी टीव्ही या हिंदी वाहिनीवरील गुन्हेगारी कथांवरील आधारित (क्राईम पेट्रोलिंग) या मालिकेत ऑनलाईन असलेल्या पेंटिंगची प्रिंट काढून आपली परवानगी न घेता वापरल्याचा आरोप मोशीतील प्रसिद्ध चित्रकार सुधीर बांगर यांनी केला आहे.  

मोशी येथे राहणारे सुधीर बांगर प्रसिद्ध चित्रकार आहेत. 1981 पासून चित्रे काढण्याची कला ते जोपासत आहेत. त्यांनी काढलेल्या पेंटिंगचे 87 प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बांगर यांनी विक्रीसाठी पेंटिंग ऑनलाईन ठेवल्या आहेत. सोनी टीव्हीने गुन्हेगारी कथांवरील आधारित मालिकेत त्यांच्या परस्पर ऑनलाईन पेंटिंगची प्रिंट काढून वापरले आहेत. पेंटिंग वापरण्याबाबत आपल्याला साधे विचारले देखील नाही. मालिकेत वापरलेल्या पेंटिंगची मूळप्रत आपल्याकडे असल्याचे बांगर यांनी सांगितले.  

सोनी टीव्हीवरील गुन्हेगारी कथांवरील आधारित मालिकेत 23 फेब्रुवारीला त्यांचे पेंटिंग वापरल्याचे त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. त्याने बांगर यांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत सोनी टीव्हीच्या अधिका-यांशी बांगर संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्यापपर्यंत संपर्क झाला नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसून तक्रार देण्याचा विचार करत असल्याचे बांगर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. 

गेल्या 40 वर्षांपासून मी पेंटिंग काढण्याची कला जोपासत आहे. आमची परवानगी न घेताच हिंदी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये पेंटिंग परस्पर वापरल्या जात आहेत. याचे दु:ख वाटते. त्याचा मोबादला देखील दिला जात नसून श्रेय सुद्धा दिले जात नाही. तसेच सरकारचे ही चित्रकारांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे चित्रकार भरडला जात आहे. परस्पर पेंटिंग वापरल्याने दु:ख झाल्याचे सुधीर बांगर यांनी सांगितले.   

दरम्यान, याबाबत सोनी टीव्हीच्या अधिका-यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.     

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.