भाजपतर्फे पुणे महापालिका गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड जाहीर

महापौरपदाच्या नावाची घोषणा बुधवारी दुपारपर्यंत होणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या गटनेतेपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आल्याचे अधिकृत पत्र आज भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिले. तर याच वेळी पुण्याच्या महापौरपदाच्या दावेदार असलेल्या मुक्ता टिळक यांच्या नावाची घोषणा केली जाणार असे सांगण्यात आले होते. मात्र, आज ही घोषणा झाली नसून बुधवारी दुपारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता शहर अध्यक्षांनी वर्तवली.

या निवडीनंतर नवनियुक्त गटनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. त्याच बरोबर या पुढील काळात पुणे महापालिकेतील प्रत्येक कामात पारदर्शकता असणार आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार असून दर तीन महिन्यांनी पक्षाने महापालिकेत केलेल्या कामांचा आढावा आणि नगरसेवकाच्या कामाचा आढावा अहवाल शहर अध्यक्षाकडे दिला जाणार आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, मागील 15 वर्षात शहराशी निगडित राहिलेले प्रश्न मार्गी लावले जाणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी शहरअध्यक्ष योगेश गोगावले यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, योग्य वेळी पक्षाच्या आदेशानुसार महापालिकेतील विविध पदांची घोषणा देखील करण्यात येणार असून उद्या सकाळी गटनेत्यांसह पक्षातील सर्व नगरसेवकांची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले असून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला बालकल्याण, शहर सुधारणा समिती, नाव समिती, शिक्षण मंडळ अध्यक्ष यासह 15 क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष या पदावर आपली वर्णी लागावी. यासाठी प्रत्येक नगरसेवकाची धडपड होताना दिसत असून पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या गाठभेटी घेण्यात येत आहे. या पक्षात 98 नगरसेवक असून त्यापैकी किती जणांना पक्षाकडून संधी दिले जाते. हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

मात्र, त्यामध्ये महापौरपदी मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित मानले जात असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारीपर्यंत होणार आहे. आज घोषणा न झाल्याने पक्षातील नगरसेवक काही प्रमाणात तरी संभ्रम अवस्थेत आहे. आता पक्षाकडून इतर पदाच्या नावाची घोषणा केव्हा केली जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.