शनिवार, डिसेंबर 3, 2022

सचिन शेळके खून व नाणेकरवाडीतील प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपीस अटक

(अविनाश दुधवडे)

नाणेकरवाडीती हल्ला वर्चस्ववादातून झाल्याचा संशय


एमपीसी न्यूज – चाकण जवळील नाणेकरवाडीतील नाणेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोघा आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी आरोपी मॉण्टी हा तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खून प्रकरणात फरार होता. नाणेकरवाडीतील प्राणघातक हल्ला प्रकरणात आज अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

मॉण्टी उर्फ संकेत जगदीश नाणेकर (वय-19 वर्ष, रा. नाणेकरवाडी, ता.खेड, जि. पुणे) व  भीम पालखी कुशवाह (वय-19 वर्ष सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा. बिहार), अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून त्यांचा आणखी एक साथीदार मात्र अद्याप फरार आहे.

चाकण जवळील नाणेकरवाडी (ता.खेड, जि.पुणे ) येथील महाराजा ग्रुपचा युवा कार्यकर्ता गणेश संभाजी नाणेकर उर्फ महाराज (वय 31) याच्यावर मागील महिन्यात शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील शेतात धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्लाकेल्या प्रकरणी अखेर चाकण पोलिसांनी शनिवारी (दि.4) रात्री दोघांना अटक केली आहे. प्राणघातक हल्ल्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातील वर्चस्वाच्या इर्षेतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारीला रात्री अकराच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी नाणेकरवाडी (ता.खेड) येथे गणेश नाणेकर यांना अडवून ओढत रस्त्याच्या लगतच्या शेतात नेऊन डोक्यात कोयत्याने लांब सुऱ्याने पोटात गंभीर वार केले होते. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. गंभीर जखमी गणेश नाणेकर यांना प्रथम चाकणमधील व त्यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटात सुरा भोकसल्याने नाणेकरच्या पोटातील काही अवयव निकामी झाले असून अद्यापही त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर चाकणचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस हवालदार नामदेव जाधव, दत्ता जाधव, अजय भापकर, अनिल गोरड, अशोक साळुंके आदींच्या पथकाने अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अनेक तांत्रिक बाबींचा आधार घेत मॉण्टी व भीम या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी गणेश व मॉण्टी हे नाणेकरवाडीतच शेजारी- शेजारी राहण्यास आहेत. गणेश याने मागील काही वर्षात स्वतःचे वाढदिवस मोठ-मोठे होर्डिंग व अनेक बड्या हस्तींसह शेकडो युवकांना आमंत्रित करून भवदिव्य प्रकारे साजरा केला होता. त्यामुळे मॉण्टी गणेश  यांच्यात एकप्रकारे इर्षा व वर्चस्वाचा वाद निर्माण झाला होता. त्यातूनच गणेश नाणेकर याच्यावर हल्ला करण्यासाठी मॉण्टी व त्याच्या अन्य साथीदारांनी आठवडाभर आधीपासून (15 फेब्रुवारीपासून) प्रयत्न चालविले होते. 24 फेब्रुवारीला  रात्रीच्या वेळी गणेश एकटा मिळून आल्यानंतर त्याच्यावर हा प्राणघातक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी सांगितले.

आरोपी मॉण्टीची पार्श्वभूमी

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला प्रमुख आरोपी मॉण्टी उर्फ संकेत नाणेकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खून प्रकरणात मॉण्टी हा फरार आरोपी होता. त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे चाकण पोलिसात त्याच्यावर गंभीर मारहाण, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत.

आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

मॉण्टी व भीम या दोन्ही अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी (दि. 5) खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना नऊ दिवस (14 मार्चपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनेतील आणखी एका फरारी आरोपीचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश ढवाण, उपनिरीक्षक महेश मुंडे व त्याचे सहकारी करीत आहेत.

Latest news
Related news