सॉलिटेअर संघाने पटकावले विजेतेपद

फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा 2017

एमपीसी न्यूज – धीरज गुंदेशाच्या आक्रमक अर्धशतकानंतर अभय जैनने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सॉलिटेअर इलेव्हन संघाने मेपलप्लाय मास्टर्स संघावर 16 धावांनी मात करून फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

सॉलीटेअर संघाने दिलेल्या 105 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेपलप्लाय मास्टर्स संघाला 7 बाद 88 धावाच करता आल्या. पुणे व्यापारी महासंघ आयोजित ही स्पर्धा मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झाली. स्पधेर्चे यंदा दुसरे वर्ष असून मुख्य प्रायोजक पॉलिकॅब आणि सहप्रायोजक व्हिटीपी ग्रुप, फाल्कोफीक्स आणि सॉलीटेअर होते.

सॉलीटेअर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सॉलीटेअर संघाने निर्धारित 12 षटकांत 6 बाद 104 धावा केल्या. सॉलीटेअर संघाची सुरुवात निराशाजनक झाली. लढतीच्या चौथ्या षटकात विपूल ओसवालने सलग दोन चेंडूंवर धीरेश सोलंकी आणि अंकित सोनीग्रा यांना त्रिफळाबाद केले. यानंतर धीरजने सचिन जैनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. अकराव्या षटकात विपूलने धीरज आणि सचिन दोघांना बाद केले. धीरजने 39 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 67 धावा केल्या, तर सचिनने 15 चेंडूंत 19 धावांची भर घातली. इतर फलंदाजांनी सॉलीटेअर संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. मास्टर्सकडून विपूल ओसवालने 4 गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कुणाल शाह (०), कौशिक शाह (2) झटपट माघारी परतले. विपूलने 14 चेंडूंत 23 धावांची भर घातली. महेंद्र पाटीलने एका बाजूने किल्ला लढविला, पण त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. महेंद्रने 34 चेंडूंत 2 षटकार व 1 चौकारसह 43 धावा केल्या. अभय जैनने मधल्या फळीतील चौघांना बाद करून मेपलप्लाय मास्टर्स संघाला 88 धावांतच रोखले. अभयने 4 गडी बाद करून सामनावीरचा पुरस्कार मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रणजी क्रिकेटपटू मुर्तझा ट्रंकवाला यांच्या हस्ते झाले. यावेळी पॉलिकॅबचे नितीन बेले, व्हिटीपीचे राजेश पालरेशा, फाल्कोफिक्सचे भरत भोमावत, सॉलिटेअरचे अतुल चोरडिया, व्हिडीओकॉनचे गौरव चंद्रा, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया, स्पर्धेचे समन्वयक अभय वोरा, फेडरेशनचे उपाध्यक्ष रतन किराड, सुभाष संघवी, राजेश शहा आदी उपस्थित होते.

धीरज गुंदेशा याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. धीरेश सोलंकी सर्वोत्तम फलंदाज तर अभय जैन याला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक षटकार मिथुन किराड, सर्वाधिक चौकार धीरेश सोलंकी यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह आणि विजेत्या स्पर्धकांना एलईडी टिव्ही व वॉशिंगमशिन वैयक्तिक पारितोषिक म्हणून देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक – सॉलिटेअर इलेव्हन – 12 षटकांत 6 बाद 104 (धीरज गुंदेशा 67, सचिन जैन 19, विपूल ओसवाल 4-22, जिनेश ओसवाल 1-21) वि. वि. मेपल प्लाय मास्टर्स – 12 षटकांत 7 बाद 88 (महेंद्र पाटील 43, विपूल ओसवाल 23, अभय जैन 4-14, सुदर्शन कवेडिया 1-15, पवन ओसवाल 1-17, गौतम कवेडिया 1-5). सामनावीर – अभय जैन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.