पाईटमध्ये विवाहितेवर दिराचा बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – एका सत्तावीस वर्षीय विवाहितेवर तिच्या चुलत दिराने अतिप्रसंग केल्याचा प्रकार पाईट (करंडेवाडी, ता.खेड) येथे घडला. या घटनेनंतर संबंधित विवाहितेने विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर पिंपरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी चुलत दिरावर चाकण पोलिसांनी सोमवारी (दि.6) बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित विवाहिता दोन दिवसांपूर्वी (दि. 4 मार्च) पाईट येथील स्वतःच्या घरात टीव्ही पाहत असताना आरोपीने घरात शिरून व धमकावून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. संबंधित किळसवाणा प्रकार खुद्द आरोपीच्या पत्नीनेही पहिला. त्यानंतर सलग दोन दिवस यावरून मोठे वाद झाले. त्यानंतर पीडीत विवाहितेने विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र, तिला तात्काळ पिंपरीतील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हवालदार रमेश नाळे, अजय भापकर व त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.