वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या उत्सवमूर्तीचे पुण्यात आगमन

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात गुरुवारी दर्शनाची सोय

एमपीसी न्यूज – श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या उत्सवमूर्तीचे आगमन समाधी क्षेत्र गरुडेश्वर, गुजरात येथून गुरुवारी, (दि. 9) पुण्यामध्ये होत आहे. अखिल भारतीय त्रिपदी परिवार, पुणेतर्फे महाराजांच्या उत्सवमूर्तीचे वास्तव्य गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 8 यावेळेत बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात असणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तमंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

स्वामी महाराजांची ही उत्सव मूर्ती श्री क्षेत्र गरुडेश्वर येथून हावनूर, कर्नाटक येथील चातुर्मास स्थळी जाण्यास निघाली आहे. श्री क्षेत्र गरुडेश्वर दत्तमंदिराचे प्रमुख विश्वस्त चंद्रकांत गोवारीकर आणि त्यांचे सहकारी ही मूर्ती घेऊन येत आहेत. या मार्गात उत्सवमूर्तीचा मुक्काम पुण्यामध्ये असल्याने पुणेकरांना टेंबे स्वामी यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त 2014 मध्ये हीच उत्सवमूर्ती स्वामींनी केलेल्या चातुर्मास क्षेत्री व प्रमुख दत्त क्षेत्री भ्रमण करून आली आहे. त्यामध्ये गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर, माणगाव, नागपूर, कारंजा, पवनी, पुणे, मुंबई, इंदौर, उज्जैन, मंडलेश्वर, तराणा, ब्रह्मावर्त, बडोदा, हैदराबाद, बंगळुरू, तंजावर अशा अनेक क्षेत्रांचा समावेश होता. यंदा पुण्यामध्ये उत्सवमूर्तीचा मुक्काम असल्याने दत्तमंदिरामध्ये मोठया संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.