रविवार, फेब्रुवारी 5, 2023

पुणे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवार देणार!

गटनेत्याचे नाव बुधवारी जाहीर     

एमपीसी न्यूज – पुणे महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित असून बुधवारी (दि.8) त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचा महापौर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीदेखील उमेदवार देणार आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर गटनेत्यासाठीचे नाव पक्षाच्या वतीने उद्या जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  

पुणे महापालिकेच्या महापौरपदासह सर्व पदांसाठी उद्या 8 तारखेला नामनिर्देशित विभागीय आयुक्तांकडे जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत खासदार वंदना चव्हाण यांनी मावळते महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक चेतन तुपे, दत्तात्रय धनकवडे, नंदा लोणकर या नगरसेविका समवेत महापौर आणि गटनेता पदाबाबत जवळपास 1 तास चर्चा केली. विरोधी पक्षनेत्यासाठी तब्ब्ल 13 जण इच्छुक होते. मात्र, त्यापैकी आता पक्ष कोणाला संधी देणार हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

या बैठकीनंतर चव्हाण म्हणाल्या की, आज कोणत्याही प्रकारे ठोस निर्णय घेतला गेला नसून उद्या दुपारपर्यंत महापौरपदाचा आणि विरोधी पक्षनेता पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कमी असले. तरी लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याने आम्ही या निवडणुकीमध्ये पक्षाचा उमेदवार देणार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Latest news
Related news