पुणे विमानतळाची सुरक्षा भेदून गर्लफ्रेंडला भेटण्याची धडपड तरुणाच्या अंगलट

एमपीसी न्यूज – जुन्या तिकिटात फेरफार करून लोहगाव विमानतळावर गर्लफ्रेंडला भेटण्यासाठीची धडपड एका उच्चशिक्षित तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू देशातील एक महत्वाचे विमानतळ असलेल्या पुणे विमानतळाची सुरक्षा किती कमकुवत आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. हा सर्व प्रकार रविवारी (दि. 5 मार्च) घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संबंधित तरूण हा पुणे शहरात सीएच्या परीक्षेची तयारी  करत आहे. त्याची एक मैत्रीण  पुण्यामार्गे गोव्याला जाणार होती. तिला भेटण्यासाठी तो लोहगाव विमानतळावर गेला. विमानतळावर गेल्यानंतर आत प्रवेश करण्यासाठी पास किंवा तिकीट आवश्यक असते. संबंधित तरुणाने काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सचे ऑनलाइन तिकीट काढले होते. त्यामध्ये लॅपटॉपच्या सहाय्याने फेरफार करून तिकीटात बदल केला आणि विमानतळावर प्रवेश करून मैत्रिणीची वाट पाहू लागला.

दरम्यान, त्याने विमान कंपनीच्या व्यवस्थापकाला विनंती करून मैत्रिणीला भेटण्यासाठी आत जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. व्यवस्थापकाने तत्काळ ही माहिती सुरक्षा विभागाला कळवली. सुरक्षा विभागाने त्याचे तिकीट तपासले असता ते खोटे आणि बनावट असल्याचे समोर आले आहे. आता या घटनेनंतर लोहगाव विमानतळावर प्रवाशाची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्नसमोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.