तिच्या ‘मासिक पाळी’ साठी झगडणारा तो…..

 

जागतिक महिला दिन विशेष

(शर्मिला पवार)

 

एमपीसी न्यूज – आजही म्हणजे 4 जी, व्हॉटस् अॅपच्या जमान्यातही चोरून किंवा लपवून बोलला जाणारा विषय म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी. हा विषय कायमच  खासगीत बोलला जातो, त्याबद्दल उघडपणे बोलण्यास देखील मनाई आहे.  मुली-मुली बोलत असताना सुद्धा या विषयाला टोपण नाव देऊन बोलले जाते किंवा सरळ ‘नंतर बोलू ‘ म्हणून विषय टाळला जातो. मुळात स्त्रियाच या विषयावर बोलणे टाळतात. त्यामुळे आजही याबाबतीत स्त्रियांना होणारे आजार किंवा त्यांच्या इतर समस्या, शंका याबाबत कायमच अज्ञान राहिले आहे. मात्र, या सा-या गोष्टींना तडा देत तो लढतोय. तो तयार आहे उघडपणे बोलायला या सा-या गोष्टींवर…अशाच या तिच्यासाठी झटणा-या ‘त्या’ ची ओळख…

 

ही कथा खूप वर्षांपूर्वीची नाही. अगदी  गेल्या सहा वर्षांपासून प्रवीण निकम हा  महिलांच्या मासिक पाळी या समस्येवर झगडत आहे. त्याने त्याच्या या लढ्याबद्दल सांगितलेली त्याचीच ही गोष्ट. प्रवीण निकम हा इंजिनिअरिंग करणारा तरुण 2011 मध्ये अभ्यास दौ-यासाठी आसामला गेला असताना, त्याची भेट आसामच्या रोशनी या मुलीशी झाली. ती त्यावेळी सिल्कची साडी विणत होती. तिला तू शाळेत जात नाही, असे विचारले असता तिने दिलेले उत्तर धक्कादायक होते. ती म्हणाली,"दादा मला देवाने शिक्षा केलीय." याचा अर्थ तिच्या वडिलांना विचारला तेव्हा त्यांनी तिला महामारी झाली आहे, असे सांगितले. पण ती तर धडधाकट दिसत होती. खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा कळाले की तिला टीव्हीवर दाखवतात ना ‘स्टे-फ्री’  सारखे झाले आहे. या सा-या संवादातून प्रवीणला जाणवले की आपण अजून काळाच्या खूप मागे आहोत.  

 

याविषयी बोलताना प्रवीण म्हणाला की, त्या दिवसापासून आपण यावर बोललं पाहिजे याची जाणीव मला झाली. मी ट्रीपवरून परत आलो. त्यानंतर अवघ्या 12 लोकांनी मिळून रोशनी या नावाने  संस्था चालू केली. यासाठी मी माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडले. माझे बाबा पिंपरीच्या एच.ए. कंपनीत काम करतात. त्यामुळे एच. ए. कंपनीचे थांबलेले पगार घरातील आर्थिक चणचण हे सारे असतानाही त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर मी बी.ए.च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला व माझे काम सुरू केले. यावेळी मी वस्तीवरील मुली व स्त्रियांशी संपर्क साधायला सुरुवात केली. दरम्यान, बार्टी या संस्थेकडून संबंधित विषयावर प्रशिक्षण देणे किंवा मार्गदर्शन करणे यासाठी मी प्रमाणपत्र मिळवले. कामगार महिलांशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या मुलांना शिकवणे, खेळवणे थोडक्यात त्यांच्यामध्ये मिसळायला सुरुवात केली. त्यांना जेव्हा आम्ही आपलेसे वाटायला लागलो तेव्हा बोलत-बोलत मासिक पाळी, त्यावेळी येणा-या  समास्या यावर बोलायला लागलो.

 

त्यावेळी जाणवले की, ही परिस्थिती केवळ आसाममध्ये नाही तर महाराष्ट्रातही आहे. मी कालांतराने देशाच्या बाहेरही गेलो तर तिथेही हेच जाणावले की, जगात थोडया फार फरकाने मासिक पाळी हा न बोलला जाणारा किंवा वाईट लेखला जाणारा विषय आहे. अफ्रिकेतल्या झांबिया या भागात तर स्त्रिया  मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे कापड जाळतात व देवाकडे प्रार्थना करतात की माझे उरलेले 28 दिवस चांगले जाऊ देत. हीच परिस्थिती नेपाळ, अफगाण या देशातही आहे. त्यामुळे आम्ही ठरवले की आपल्या राहत्या परिसरापासूनच आपण सुरुवात केली तर यातूनच रोशनी जन्माला आली.

 

आज माझ्या साथीला 200 सहकारी आहेत जे पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहर व आसपासच्या खेड्याच्या परिसरात काम करत आहेत. आम्ही यावेळी महिला व पुरुष या दोघांशीही या विषयावर चर्चा करतो. त्यांच्या याबाबतच्या शंका, प्रश्न, गैरसमज यावर मार्गदर्शन करतो. यावेळी पुरुषांना ही एवढे महत्वाचे नाही, किंवा यात माझी जबाबदारी काय असे वाटते, तर महिला व अगदी पुण्यामध्ये लॉ कॉलेजला जाणा-या मुलीही आमच्या घरी चालत नाही म्हणून याविषयी बोलत नाही किंवा घरात कशाला शिवत नाहीत. तर दुस-या बाजूला कामगार महिला किंवा वस्तीवरील महिला या पाच दिवसातही पतीच्या जबरदस्तीला बळी पडत आहेत.

 

त्यांना याची कल्पनाच नाही की पती असला तरी हा त्यांच्यावर होणारा एक प्रकारे लैंगिक अत्याचारच आहे. त्यामुळे आम्ही केवळ याकाळात घेतली जाणारी स्वच्छता, आहार एवढेच नाही सांगत तर महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, त्यांचे हक्क अगदी याबाबतही त्यांच्यात जनजागृती करावी लागते. यातील धक्कादायक बाब म्हणजे मध्यमवर्गीय व उच्च वर्गातील स्त्रिया या आत्याचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे केवळ अशिक्षित नाही तर शिक्षित महिला, त्यांचे पती, भाऊ, वडील यांच्यातही जागृती, मोकळा संवाद होणे गरजेचे आहे, असे प्रवीणने सांगितले.

 

यावेळी महिलांविषयी बोलताना प्रवीण म्हणाला की, मुळात महिलांनी आपली शक्ती ओळखून मासिक पाळी हा शाप नसून ते वरदान आहे, हे ओळखले पाहिजे आपण आई का व कशामुळे होतो हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर तुमच्यावर जबरदस्ती होत असेल मग तो भलेही नवरा असो त्याला नकार द्यायला शिका, या गोष्टी झाकून ठेवण्याऐवजी त्यावर बोलायला शिका कारण जोपर्यंत त्या बोलणार नाहीत तोपर्यंत त्यांना हे सहन करावे लागणार आहे. पुरुषांनीही मी काय करू शकतो असे न म्हणता तिच्या या शक्तीमुळेच तुम्ही बाबा बनू शकता हे जाणून घेऊन तिला समजून घ्यायला शिकले पाहिजे. जेवढी जबाबदारी स्त्रिची आहे तेवढीच ती पुरुषाचीही आहे, असेही प्रवीणने ठामपणे सांगितले.

 

आज प्रवीण शिक्षण घेत ही सारी जबाबदारी पार पाडतोय. दरम्यान प्रवीणची राष्ट्रकुल युवा परिषदेच्या आशिया खंडाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्याच्या या कामाचे राणी एलिझाबेथ यांनी स्वतः भेटून ‘चॅम्पियन्स ऑफ युथ’ असे विशेषण देऊन कौतुक केले. तो आता महिलांच्या या समस्या, लैगिक शिक्षण अभ्यासक्रमात सहभागी व्हावे, यासाठी तो झगडत आहे. तो आज महिला दिनानिमित्त देशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांना महिलांच्या सॅनिटरी पॅडवर जे कर लावले जातात ते  बंद करावेत, अशी मागणी करणारे पत्र लिहणार आहे. ज्यामुळे अधिक स्वस्त होतील व त्यांचा वापर  गरीब महिलाही  करू शकतील, त्याचे हे काम गर्वाने व जोमाने करत आहे. तिच्यासाठी आपण काही तरी देणं लागतो या भूमिकेतून तो ज्या गोष्टी समाजाने अडगळीत टाकल्या होत्या किंवा ज्याविषयी बोलण्यावर बंदी आणली होती. त्यावर तो उघडपणे बोलायला, तिला साथ द्यायला तयार आहे.­­

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.