भर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाला लुबाडून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

नाशिक फाटा येथील धक्कादायक प्रकार 

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटून पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देऊन जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक अमानुष घटना आज (बुधवारी) भरदुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा येथे घडली. 

उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक), असे पेटवून देऊन जाळण्याचा प्रयत्न केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. यामध्ये 40 ते 45 टक्के भाजले असून पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उद्धव उनवणे हे मूळचे नाशिकचे रहिवाशी आहेत. चिंचवड येथील एका खासगी कंपनीत ते नोकरी करतात. सध्या आळंदी येथे ते राहत आहेत. त्यांचे घर भाडे धकले आहे. बुधवारी दुपारी नाशिक येथून उनवणे पैसे घेऊन वल्लभनगर बस स्थानकात आले होते.

वल्लभनगरहून ते नाशिक फाट्याकडे पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरील तिघेजण त्यांचा पाठलाग करत होते. नाशिक फाटा येथे उनवणे बसले होते. त्यावेळी आलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन पोबारा केला. यामध्ये उनवणे 40 ते 45 टक्के भाजले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते पोपट शहा आणि संतोष कासार यांनी उनवणे यांना त्वरित उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेले. वायसीएममध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. उनवणे गंभीर भाजले असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले असल्याचे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.