चार महिन्याच्या मुलीचे संगोपन करण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे उच्चशिक्षित आईची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील फुरसुंगी येथे चार महिन्याच्या मुलीचे संगोपन करण्यास असमर्थ ठरत असल्याच्या कारणारून एका उच्चशिक्षित आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


प्रीती सूरज लांडगे (वय 23, रा. जयहिंदनगर, फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बी. एस. डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रीतीचे बी. ई. कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झाले होते. एका कंपनीत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होती. 2015 मध्ये व्यावसायिक असलेल्या सूरज यांच्याशी तिचा विवाह झाला होता. सध्या ती बाळंतपणासाठी फुरसुंगी येथे माहेरी आली होती व नोव्हेंबर 2016 मध्येच तिने मुलीला जन्म दिला होता.

रविवारी (5 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कपड्यांना इस्त्री करण्यासाठी जाणार असल्याचे सांगत ती घराबाहेर पडली परंतू रात्र झाली तरी ती परतली नाही. म्हणून आई-वडिलांनी तिचा शोधा घेतला, परंतु ती आढळली नाही. अखेरीस आई-वडिलांनी याबाबत हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली.

त्यानंतर सोमवारी (6 मार्च) सकाळी अकरा वाजता घरापासून जवळच असलेल्या विहिरीत प्रीतीचा मृतदेह आढळला. पोलिसांना तिने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली असून त्यात तिने मी चार महिन्यांच्या मुलीचे संगोपन करू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. तसेच माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.

याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मुंदडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बहुतांश वेळा प्रसुतीनंतर महिलांमध्ये (पोस्टपार्टम डिप्रेशन) हार्मोन्स बदलतात. त्यामुळे अशावेळी त्या महिलेमध्ये नकारात्मक विचार येतात आणि आपण नेमके काय करत आहोत याचे भान राहत नाही. हा कदाचित त्यातलाच प्रकार असू  शकेल. परंतू याविषयी ठोस निर्णय सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.