फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मध्य रेल्वे संघांचा उपांत्यपूर्व फेरीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मध्य रेल्वे (पुणे विभाग) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने पुणे मॅग्निशियन संघाचा 5-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. सुनील वाघमारे याने 22 व्या मिनिटाला गोल करून एफसीआय संघाचे खाते उघडले. पुर्वार्धात एकच गोल झाला व एफसीआय संघाने एकमेव गोलासह आघाडी घेतली. हाफ टाईमनंतर पुणे मॅग्निशियन संघाच्या सुनील राजबाहीर याने गोल करून 1-1 अशी बरोबरी निर्माण केली. आकाश पवार याने 32 व्या मिनिटाला गोल करत एफसीआय संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये एफसीआयच्या खेळाडूंनी 3 गोल केले. विनीत निलम याने 40 व्या, आकाश पवारने 45 व्या, सुनील वाघमारेने 49 व्या मिनिटाला गोल करून संघाला 5-1 अशी भक्कम आघाडी मिळवून देत सामन्यात विजय मिळवला.

दुसर्‍या सामन्यामध्ये मध्य रेल्वे (पुणे विभाग) संघाने रेल्वे पोलीस संघाचा सडन डेथमध्ये 4-3 असा पराभव करून आगेकूच केली. रेल्वेपोलीस संघाच्या रोहिदास मुसळे याने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मध्य रेल्वे संघाच्या नवनीत सौरनकर याने गोल करून संघाला 1-1 अशी बरोबरी निर्माण करून दिली. बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये ही 2-2 अशी बरोबरी झाल्याने सामना सडनडेथ पद्धतीमध्ये खेळवण्यात आला. यामध्ये मध्य रेल्वेच्या नवनीर सौरणकर याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा निकालः 1) फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः 5 (सुनील वाघमारे 22, 49 मि., आकाश पवार 32, 45 मि., विनीत निलम 40 मि.) वि.वि. पुणे मॅग्निशियनः 1 (सुनील राजबाहीर 27 मि.); हाफ टाईमः 1-0;

2) मध्य रेल्वे (पुणे विभाग) 1 (2, 1) (नवनीत सौरनकर 44 मि.; जितेंद्र सिंग, नवनीत सौरणकर; नवनीत सौरणकर) वि.वि. रेल्वे पोलीसः 1 (2, 0) (रोहीदास मुसळे 35 मि., राजेश मुसळे); हाफ टाईमः 00;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.