वरिष्ठांनी लैंगिक छळ केल्यानेच मोनिका शर्माची आत्महत्या; नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज – आईच्या मृत्यूच्या विरहाने नव्हे तर काम करत असलेल्या कंपनीतील एका वरिष्ठाने लैंगिक छळ केल्यामुळेच मोनिका शर्माने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मोनिका शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बावधन येथे 28 वर्षीय मोनिका शर्माने 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. परंतु ती काम करत असलेल्या कंपनीतील एका वरिष्ठाने तिचा लैंगिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली आहे, असा आरोप केल्याने तपासाच्या सुया आता वेगळ्या पद्धतीने फिरतील.

याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी ती काम करत असलेल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी रणजीत मिश्रा याच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार मयत मोनिका आणि रणजित मिश्रा एकत्र राहत होते. मिश्रा हा आपल्या बायकोला घटस्फोट देऊन हे दोघे लग्न करणार होते. दरम्यान, या दोघांमध्येच काहीतरी बिनसले आणि मोनिकाने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या निर्णयाला रणजित मिश्रा याने विरोध करत तो तिला रिलेशनशिपमध्ये राहण्याची जबरदस्ती करत राहिला आणि त्याने तिचा मानसीक आणि लैंगिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून अखेरीस मोनिका शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.