समतोल राखत महापौरांची निवड – गिरीश बापट

एमपीसी न्यूज  – एकमताने  महापौर पदासाठी भाजपने उमेदवार निवडला आहे. यामध्ये शहरात आम्ही समतोल राखत महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार दिले आहेत, असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापौर व उपमहापौरपदासाठी आज अर्ज भरण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट स्वतः अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत पत्रकारांनी नामदेव ढाके यांचे नाव चर्चेत असताना नितीन काळजे यांचा अर्ज कासा भरला गेला व शेवटपर्यंत नावाबाबत गुप्तता का राखली गेली असा प्रश्न विचारला असता बापट म्हणाले की, महापौर उमेदवार निवड ही पक्षांतर्गत बाब आहे. तसेच महापौरपदासाठी अनेक जण  इच्छुक होते. त्यामुळे रुसवे फुगवे होणारच. मात्र, सर्वांची समजूत काढण्यात आली आहे.  ही निवड हसत-खेळत वातावरणात व एकमताने झालेली आहे, असेही बापट यांनी सांगितले.

अधिवेशनामुळे दोन्ही आमदार आले नाहीत – एकनाथ पवार

आज महापौरपदाच्या अर्जावरून जगताप व लांडगे गटात चांगलेच वातावरण तापले होते. मात्र, शेवटी लांडगे गटाला महापौरपद देण्यात आले. यावेळी दोन्ही आमदार उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले होते. याविषयी पत्रकारपरिषदेत बोलताना एकनाथ पवार म्हणाले की, स्वतः गिरीश बापट येथे उपस्थित होते व उन्हाळी अधिवेशनामुळे दोन्ही आमदार येऊ शकले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.

तसेच ते म्हणाले की, समाविष्ट गावांना  काळजे यांच्याद्वारे नवा चेहरा मिळाला. येत्या पाच वर्षात पारदर्शक कारभार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. समाविष्ट गावांच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. महापौरपदासाठी 4 लोक  इच्छुक होते. मात्र, सर्वांना एकाचवेळी न्याय देणे शक्य नाही. त्यामुळे नाराजांचीही नाराजी काढण्यात येईल. अडीच वर्षासाठी आहे. मात्र, पक्षाच्या धोरणानुसार महापौर पदाचा कार्यकाल ठरेल.


यावेळी राष्ट्रवादीतर्फे महापालिकेवर उपलोकपाल नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, अधिकृत घोषणा झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू, असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.