…आता वेध स्थायी समिती सभापती पदाचे; चिंचवडला मिळणार संधी?

नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, माया बारणे प्रबळ दावेदार


एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर आता स्थायी समितीमध्ये सदस्य आणि  सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या तिजोरीची  चावी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात स्थायी समितीपदाची माळ पडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे यांनी महापौरपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे पहिले महापौर होण्याचा मान काळजे यांना मिळणार आहे. काळजे यांच्या रुपाने महापौरपद आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार ही दोन्ही पदे भोसरी मतदार संघाला मिळाली आहेत.

निगडी, प्राधिकरणातून प्रथमच निवडून आलेल्या शैलजा मोरे यांच्या माध्यमातून पिंपरी मतदार संघात उपमहापौरपद मिळाले आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपद चिंचवड मतदार संघातील नगरसेवकाला मिळण्याची शक्यता आहे. महापौरपद आयाराम नगरसेवकाला दिल्यामुळे भाजपमधील निष्ठावान नाराज झाले आहेत. त्यामुळे स्थायी समिती सदस्य आणि सभापती निवडीमध्ये निष्ठावान आणि आयाराम मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती निष्ठावान नगरसेवकाला मिळते, की पुन्हा आयारामांनाच पायघड्या घातल्या जातात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती सभापतीपद चिंचवड मतदार संघाला मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकाची स्थायी समिती सभापती वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. महापौरपदासाठी डावलेले आणि चिंचवड मतदार संघातील असलेले नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, माया बारणे, शशिकांत कदम, करुणा चिंचवडे या आमदार जगताप यांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांपैकी एकाची स्थायी समिती सभापती निवड होण्याची दाट शक्यता आहे.

निष्ठावान आणि आयारामांचा वाद उफाळल्यास नामदेव ढाके, शितल शिंदे, संदीप कस्पटे या भाजपच्या जुन्या  पदाधिका-यांपैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागू शकते. याशिवाय दुस-या एखाद्या नगरसेवकाचीही स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागू शकते. स्थायी समितीत स्थान मिळाले नाही तर, एखाद्या समितीचे सभापती पद किंवा प्रभाग समितीचे अध्यक्षपद तरी मिळावे, यासाठी भाजपच्या नगसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

स्थायी समितीमध्ये 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त होऊ शकतात. भाजपचे संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपचा सदस्य स्थायी समितीचा सभापती होणार आहे. स्थायी समितीची नियुक्ती दोन वर्षाची असते. दरवर्षी आठ सदस्य समितीतून बाहेर पडतात. प्रथम वर्षी नियुक्ती झालेल्या सदस्याला एका वर्षानंतर ईश्वर चिठ्ठीने समितीतून बाहेर पडावे लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.