शाळेत कबड्डी, सासरी एकत्र कुटुंब, शेती, बचतगट ते थेट नगरसेवक पद

साधना मळेकर म्हणतात हा माझ्यासाठी सुखद धक्काच

एमपीसी न्यूज – साधना मळेकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते विजयी झाल्या. त्यांच्या या प्रवासाबद्दल बोलताना साधना मळेकर म्हणाल्या की, हा मला व माझ्या घरच्यासांठी सुखद धक्का होता. शाळेत कबड्डी, सासरी एकत्र कुटुंब, शेती, बचतगट ते  थेट नगरसेवक पद असा साधना मळेकर यांनी प्रवास केला.

साधना मळेकर यांचे माहेर  शिरगावचे, त्यांना मेहेरुनच राजकीय वारसा होता. कारण त्यांचे वडील बबनराव अरगडे हे राष्ट्रवादी मावळचे अध्यक्ष होते, तर आत्या रंजना गराडे या उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे माहेरी असल्यापासूनच त्यांना राजकारण, समाजकारण या गोष्टींची सवय होती. सासरीही त्यांच्या घरात थोरल्या जाऊबाई या सरपंच होत्या. मात्र, त्यांनी या क्षेत्रात यायचा कधी विचार केला नव्हता. त्या गेल्या 10 ते 12 वर्षापासून महिला बचतगट, महिला फंड यांच्या माध्यमातून समाज सेवा करत होत्या. प्रभागाला पडलेले आरक्षण व त्यांचे काम पाहता घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अपक्ष म्हणून या राजकारणात पाऊल टाकले व पहिल्याच झटक्यात त्या नगरसेवकही झाल्या.

याविषयी त्या बोलताना म्हणाल्या की, माहेरी जरी राजकीय वारसा असला तरी मी कधी राजकारणात पडले नाही, 20 ते 22 जणांचे एकत्र कुटुंब, त्यात घरची शेती यामुळे पहिली 10 वर्ष मी घरातील व शेतीतील कामे केली. अगदी शेतातील खुरपण्यापूसन मी सगळे केले. मुले मोठी झाल्यानंतर मागील 10-12 वर्षांपासून मी बचत गटाचे काम हाती घेतले. आता 10 ते 15 महिला बचतगट मी चालवते. त्यामुळे माझा जनसंपर्क चांगलाच वाढला. यामध्ये विशेषकरून ज्या गरीब व रोजगार करणा-या महिला आहेत त्यांचे हे बचत गट आहेत. याच महिला व घरच्यांमुळे आज मी नगरसेविका बनू शकले, असे म्हणत त्यांनी त्यांचे श्रेय महिलांनाच दिले.

राजकारण व समाजसेवेव्यतिरिक्त छंद विचारले असता त्या म्हणाल्या की, मी शाळेत असताना 10 वी पर्यंत कबड्डी खेळायचे, मला खेळाची खूप आवड होती. त्या काळात आमच्या गावातून दहा मुलामागे दोन मुली शाळेत जात, माझ्या वडिलांमुळे त्यावेळी शिक्षण घेणे शक्य झाले. माझी उंची चांगली आहे, त्यात खेळात चांगले प्राविण्य मिळवल्यामुळे माझी पोलीस भरतीमध्ये निवड झाली होती. माझी खूप इच्छा होती मात्र  ते स्वप्न काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही. आत्ताही ती खंत वाटते. मात्र, आत्ता मिळालेलीही जबाबदारी मोठी आहे. ती मी नक्की पार पाडेन. यावेळी मला संधीचा लाभ घेत  मी महिलांसाठी व बचतगटांसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.