संमेलनाध्यक्षपदाच्या काळात मिळालेल्या निधीतील रुपयाही साहित्य महामंडळाला देणार नाही – सबनीस

एमपीसी न्यूज – संमेलनाध्यक्षपदाच्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या रक्कमेतून एक रुपयाही साहित्य महामंडळाला निधी म्हणून मिळणार नाही, असे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी विद्यमान अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना सुनावले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षीय पदाच्या कारकिर्दीत डॉ. श्रीपाल सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून 1 लाख रुपये आणि डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठानकडून 5 लाखांचा निधी मिळाला होता. अशा एकूण 6 लाखांच्या निधीच्या खर्चाचा अहवाल सादर करण्यासाठी डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काही दिवसांपूर्वी संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी मिळालेल्या निधीच्या रकमेतील काही रक्कम महामंडळाला निधीस्वरुपात मिळावी, असा टोला लगावला होता. याला त्यांनी प्रत्यूत्तर दिले.

यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, त्यांनी संमेलनाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंधरा महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमांद्वारे मिळालेले एकूण 12 लाख 10 हजार रुपयांचे मानधन माझ्याकडे जमा आहे. ते मानधन मला लोकांची साहित्यसेवा केल्यामुळे मिळाले आहे. याचा वापर कुठे करायचा हा माझा प्रश्‍न असून ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे, अशा ठिकाणीच मी आर्थिक मदत करत आहे. त्यातला एक रुपयाही साहित्य महामंडळाला मिळणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान मसापला आणि डॉ.डी.वाय पाटील प्रतिष्ठानला केलेल्या खर्चाचा अहवाल सादर केला. यावेळी डॉ. सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवाद करणारे प्राचार्य अ. नि. माळी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.