लहान मुलांना पळवून नेण्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आणि देहूरोड परिसरात लहान मुलांना पळवून नेणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याच्या अफवांनी जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, या सगळ्या अफवा असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन, पोलिसांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवड आणि देहूरोड परिसरात लहान मुलांना पळवून नेणारी महिलांची टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. घराबाहेर थांबून लहान मुलं रडण्याचा आवाज काढून ही टोळी चोरी करत असल्याची अफवा पसरली आहे. याबाबत काही चोरट्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या टोळीपासून बचाव करण्यासाठी लहान मूल रडण्याचा आवाज आला, तरी देखील खात्री पटल्याशिवाय रात्री-अपरात्री दरवाजा उघडू नका, अशा खबरदारीचे उपायदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे विशेषत: महिला वर्गात कमालीचे घबराटीचे वातावरण आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, असा कोणताही प्रकार परिमंडळ तीनच्या हद्दीत घडला नसल्याचे पोलीस सांगत आहेत. 

देहूरोड, विकासनगर परिसरातील एका महिलेने मुल चोरून नेल्याची मंगळवारी सायंकाळी अफवा पसरली. महिला मुलाला रेल्वेतून घेऊन जात असल्याचे नागरिकांना समजले. रेल्वे स्थानक येथे नागरिकांनी धाव घेतली. पुण्याच्या दिशेने जाणारी लोणावळा-पुणे रेल्वे लोकल थांबविली आणि संशयित महिलेला बेदम मारहाण केली. रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. महिलेची चौकशी केली असता ते मुले तिचेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

चिखलीतून शुक्रवारी (दि.3) तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. या मुलांना पळवून नेल्याची अफवा पसरली होती. ती मुले मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.4) सापडली. बेपत्ता झालेल्या एका मुलाने दोघांना रेल्वे दाखविण्यासाठी म्हणून चिंचवड रेल्वेस्थानक येथे आणले होते. त्यांनतर ते तिघेही रेल्वेत बसून मुंबईला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचे कोणीही अपहरण केले नव्हते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, ”लहान मुले चोरून नेणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याच्या केवळ अफवा आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात अशाप्रकारचे कोणतेही गुन्हे घडलेले नाहीत. तसेच असे गुन्हे उडू नयेत यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मुलांना शाळेत सोडताना काळजी घ्यावी. आपली मुले कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे देऊ नयेत, याची शाळेला कल्पना द्यावी”, असेही शिंदे म्हणाले.  

”मुले चोरून नेत असल्याच्या सगळ्या अफवा आहेत. नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणीही खोटी माहिती सोशल मीडियावर फिरवू नये. कायदा हातात घेऊन विनाकारण मुले चोरणारी महिला म्हणून कोणालाही मारहाण करू नये. कोणावर संशय असल्यास खात्री करावी. पोलिसांना माहिती द्यावी”, असे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी केले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.