पुण्यात येत्या मंगळवारी रंगणार सोलापूर भूषण पुरस्कार वितरण सोहळा

खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल आणि सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती
एमपीसी न्यूज – सोलापूर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीत फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) सायंकाळी 5.00 वाजता पद्मावतीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक शहाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे मेघराज राजे भोसले, प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर आदी उपस्थित होते. संस्थेच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकुमार सिद्धप्पा पाटील यांना सोलापूर कार्य वैभव भूषण पुरस्कार, राजाभाऊ चौरे यांना सोलापूर शौर्य भूषण पुरस्कार, चंद्रकांत देशमुख यांना सोलापूर कृषी भूषण पुरस्कार, डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर यांना सोलापूर समाजभूषण पुरस्कार आणि क्रिकेटपटू केदार जाधव याला सोलापूर भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर म्हणाले की, पुण्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना पुणे रत्न कार्यवैभव हे विशेष पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये उद्योग व्यवसाय क्षेत्रात सचिन घाडगे व धीरज मांझी, गृह सुशोभिकरण क्षेत्रात अभिजीत कुलकर्णी व निलेश निगडे, बांधकाम क्षेत्रात अॅड.गफूर अहमद पठाण, कला क्षेत्रात स्वाती महाडिक, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. राजेश पवार, लोककला क्षेत्रात पद्मजा कुलकर्णी, पर्यावरण क्षेत्रात गोविंदराव पवार, सामाजिक क्षेत्रात चंद्रजीत कावडे, औषधनिर्मिती क्षेत्रात अनिल घनवट, सिनेनाटय क्षेत्रात माधव अभ्यंकर, नेहा सोनावणे, मेघराज राजे भोसले पोलीस क्षेत्रात विठ्ठलराव जाधव आणि पत्रकारिता क्षेत्रात मंगेश कोळपकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. तसेच महाराष्ट्राची परंपरा उलगडणा-या लावण्यसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.